संगीतदिग्दर्शक कल्याणजी वीरजी शाह यांची पुण्यतिथी
By Admin | Updated: August 24, 2016 08:43 IST2016-08-24T08:43:05+5:302016-08-24T08:43:05+5:30
संगीतदिग्दर्शक कल्याणजी वीरजी शाह यांची आज (२४ऑगस्ट) पुण्यतिथी

संगीतदिग्दर्शक कल्याणजी वीरजी शाह यांची पुण्यतिथी
- संजीव, वेलणकर
पुणे, दि. २४ - संगीतदिग्दर्शक कल्याणजी वीरजी शाह यांची आज (२४ऑगस्ट) पुण्यतिथी. कल्याणजी व त्यांचे बंधू आनंदजी यांची जोडी चित्रपटसृष्टीत अतिशय प्रसिद्ध होती. ३० जून १९२८ साली कल्याणजी यांचा जन्म झाला.
कल्याणजी आनंदजी या नावाने ख्यात असलेल्या या दोन भावांच्या जोडीने अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्याजवळ असलेल्या संगीतकौशल्याने अशी काही जादू केली की, त्या काळातील सर्व संगीतकारही भारावून गेले. नागीन चित्रपटातील ती नागीनची धून तुम्हा-आम्हा सर्वांनाच कायम स्मरणात तर राहणारी आहेच, पण त्या धूनने संपूर्ण चित्रपटसृष्टीलाही त्या वेळी आकृष्ट केले होते. कल्याणजी यांनी हार्मोनियममध्ये अशी काही जादूची कांडी बसविली की, हार्मोनियममधून बिनेचा आवाज बाहेर पडला आणि सर्वच संगीतकार अवाक् झाले. ते वर्ष होते १९५४. त्या काळी एस. डी. बर्मन, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, हुस्नलाल भगतराम, रवि अशा दिग्गज संगीतकारांची चलती होती. पण, या दोन्ही भावांचे हे कौशल्य पाहून चित्रपटसृष्टी आकृष्ट झाली नसती तरच नवल. पण, त्यासाठी त्यांना पाच वर्षे वाट पाहावी लागली आणि १९५९ साली त्यांना पहिला चित्रपट ‘चंद्रगुप्त’ मिळाला. त्यातील ‘चाहे पास हो, चाहे दूर हो, मेरे सपनोंकी तुम तकदीर हो...’ हे गाणे त्या वेळी एवढे गाजले की, मग कल्याणजी आनंदजी या जोडीला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. पोस्ट बॉक्स नं. ९९९, सट्टा बाजार, छलिया, मदारीमधील गाणीही सुपरहिट ठरली. नंतर हिमालय की गोद मे आणि जब जब फूल खिलेमधील संगीताने तर प्रेक्षक वेडावून गेले. सर्व चित्रपट हिट ठरले. या जोडीने दिलेल्या सुमारे २५० चित्रपटांपैकी १७ चित्रपटांना सुवर्णमहोत्सव आणि तब्बल ३९ चित्रपटांना रौप्यमहोत्सवांची सोनेरी किनार लाभली. नंतर तर ते त्याकाळच्या सर्वच नामवंत निर्माता-दिग्दर्शकांचे आवडते संगीतकार बनले. प्रकाश मेहरा यांनी आपल्या बहुतेक म्हणजे ९ चित्रपटांत या जोडीला संधी दिली. मनोज कुमार यांनी उपकार आणि पूरब और पश्चिआमसाठी या जोडीची निवड केली. फिरोज खान यांनी अपराध, धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाजसाठी कल्याणजी आनंदजी जोडीला काम दिले. मनमोहन देसाई, सुल्तान अहमद, राजीव राय, गुलशन राय, सुभाष घई यांनीही कल्याणजी आनंदजी जोडीचीच निवड केली. सरस्वतीचंद्र या चित्रपटातील अत्यंत सुमधुर संगीतासाठी त्यांना १९६८ सालीच पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. १९७४ साली कोरा कागज चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार या जोडीने पटकावला. मुकद्दर का सिकंदरसाठी पहिला पॉलिडोरचा प्लॅटिनम डिस्क अवार्ड त्यांना प्रदान करण्यात आला. भारत सरकारने त्यांच्या या कामगिरीची दखल घेत दोन्ही भावांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. अशा अनेक पुरस्कारांची मांदियाळी कल्याणजी आनंदजी या जोडीभोवती फिरत राहिली. पण, या पुरस्कारांनी किंवा मिळत जाणार्या यशांनी दोन्ही बंधू हुरळून गेले नाहीत. अतिशय मृदु स्वभावामुळे आणि सर्वांचा सन्मान राखणारी ही जोडी असल्यामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव आजही अतिशय सन्मानाने घेतले जाते. कल्याणजी यांचे निधन होऊन आज बारा वर्षे लोटली. पण, आनंदजी हे संगीतव्रत अजूनही जोपासून आहेत. कल्याणजींनंतर संगीताचा डोलारा आनंदजी यांनी सांभाळला आणि आजही ते नवोदितांना संगीतविषयक मार्गदर्शन करीत असतात. दोन्ही भावांचे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणजी हे शास्त्रीय संगीताची बाजू सांभाळीत, तर आनंदजी हे आधुनिक संगीताची जोड देत. त्यामुळे कोणतेही गीत असो, त्याच्या चाली एवढ्या सुमधुर होत्या की, प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतले. या जोडीने दीड हजारावर गाण्यांना चाली आणि संगीत दिले.
मा. कल्याणजी वीरजी शाह यांचे २४ ऑगस्ट २००० रोजी निधन झाले.
लोकमत समूहाकडून मा. कल्याणजी वीरजी शाह यांना आदरांजली.
मा. कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेली काही गाणी
ये दुनीया वाले पुछेंगे
मेरी प्यारी बहेना
पल पल दिल के पास
समझोता गमो से कर लो