‘निळकंठ मास्तर’मधील ‘वंदे मातरम्’चा लंडनमध्ये डंका
By Admin | Updated: August 5, 2015 00:52 IST2015-08-05T00:52:04+5:302015-08-05T00:52:04+5:30
‘वंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्फूर्तिगीत. आतापर्यंत ५४ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने गायले गेले आहे. मात्र ‘निळकंठ मास्तर’ या आगामी चित्रपटात प्रथमच

‘निळकंठ मास्तर’मधील ‘वंदे मातरम्’चा लंडनमध्ये डंका
‘वंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्फूर्तिगीत. आतापर्यंत ५४ वेळा वेगवेगळ्या पद्धतीने गायले गेले आहे. मात्र ‘निळकंठ मास्तर’ या आगामी चित्रपटात प्रथमच मराठमोळ्या बाजातील ‘वंदे मातरम्’ साकारले असून, १६ गायकांनी ते गायले आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये ‘निळकंठ मास्तर’चा प्रीमियर होत असून, तेथे ‘वंदे मातरम्’चा डंका वाजेल.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘निळकंठ मास्तर’ येत्या शुक्रवारपासून पडद्यावर येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची भेट रसिकांना मिळणार आहे. ‘निळकंठ मास्तर’च्या प्रमुख भूमिकेतील ओंकार गोवर्धन, इंदूच्या भूमिकेतील पूजा सावंत, नेहा महाजन, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, निर्मात्या मेघमाला पाठारे, रोहन शहा यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले, की झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई रानडेंसारख्या अनेक वीरांगना या देशात झाल्या आहेत. अनेक मुली भूमिगत चळवळीत सामील झाल्या होत्या, पण त्यांचा इतिहास कधीच समाजासमोर आला नाही. या चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी अशा भूमिगत चळवळीत ज्या मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे, त्यांचा निश्चय, त्यांनी खाल्लेल्या खस्ता या चित्रपटातून समोर आणायचा एक वेगळा प्रयोग केला आहे.
ओंकार गोवर्धन म्हणाला, की हा चित्रपट स्वातंत्र्य चळवळीचा असल्याने समाजातील सर्व स्तरांतील लोकांची स्वातंत्र्यासाठीची धडपड, सामान्य माणसाने त्यात कळत-नकळत दिलेले योगदान हे आज असहिष्णुतेच्या काळात खूप महत्त्वाचे वाटते. स्वातंत्र्य ही कोणाची खासगी बाब नसून ते सर्वांचे आहे आणि कोणीही एका विशिष्ट धर्माचा असण्यापेक्षा प्रत्येक जण भारतीय असण्याच्या भावनेने लढत असल्याचे या चित्रपटात बघायला मिळते.
पूजा सावंत म्हणाली, की तेव्हाच्या तरुणाईमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं पॅशन होतं. त्यामुळे आजच्या मॉडर्न म्हणवणाऱ्या पिढीलाही योग्य मार्गदर्शन मिळालं, तर तेही योग्य ट्रॅकवर येऊन देशाची प्रगती करू शकतात. या चित्रपटात मी साकारलेली इंदू ही तेव्हाची मॉडर्न मुलगीच आहे. कारण ओंकारने साकारलेल्या विश्वनाथवरील प्रेमातून इंदू नकळत देशासाठी काय करते, हे बघायला मिळेल.