रहस्यभेदात गुंतवणारा खेळ

By Admin | Updated: August 9, 2015 00:12 IST2015-08-09T00:12:32+5:302015-08-09T00:12:32+5:30

थरार, गूढ, रहस्य असा फंडा सुरुवातीपासूनच चित्रपटात हाताळला असल्यास पुढे काय होणार याची उत्कंठा सतत वाढत जाते. ‘सुपर्ब प्लान’ या चित्रपटाने अगदी असाच प्लॉट निवडून यात कोण

Confusing game | रहस्यभेदात गुंतवणारा खेळ

रहस्यभेदात गुंतवणारा खेळ

- राज चिंचणकर

 ‘सुपर्ब प्लान’  मराठी चित्रपट

थरार, गूढ, रहस्य असा फंडा सुरुवातीपासूनच चित्रपटात हाताळला असल्यास पुढे काय होणार याची उत्कंठा सतत वाढत जाते. ‘सुपर्ब प्लान’ या चित्रपटाने अगदी असाच प्लॉट निवडून यात कोण कुणाला खेळवतंय याचे गूढ शेवटपर्यंत ताणत रहस्यभेदात गुंतवणारा डोकेबाज खेळ मांडला आहे.
विक्रांत राजे हा उद्योगपती, त्याच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्याची पत्नी संजनाला घेऊन कॅनडातून मुंबईत येतो. ही कंपनी संजनाच्या वडिलांनी उभी केलेली असते आणि संजना सुद्धा या कंपनीची धुरा सांभाळत असते. या कंपनीच्या एका प्रॉडक्टसाठी मॉडेल म्हणून कामिनीची निवड विक्रांत करतो. पण दिवसेंदिवस या दोघांची जवळीक संजनाला खुपू लागते. त्यातच तिचा जुना मित्र अंकुश याची तिच्याशी अचानक भेट होते. संजना तिचे मन अंकुशकडे उघड करते आणि हे दोघे विक्रांतवर पाळत ठेवतात. पण त्यांच्या नजरेपलीकडे घडणाऱ्या घटना काही वेगळ्याच असतात. त्यातच अचानक एक दिवस कामिनी गायब होते आणि या गोष्टीला वेगळेच वळण मिळते. तिच्या बँकेच्या खात्यात विक्रांतने तब्बल ४ कोटींची रक्कम जमा केलेली असते़ परिणामी, पोलिसी तपासकार्यात विक्रांतवर संशय घेतला जातो, पण पडद्यामागे भलताच डाव रंगत असतो. यामागचे नक्की गौडबंगाल काय याचा उलगडा करीत हा ‘सुपर्ब प्लान’ आकारास येत जातो.
या प्लानची कथा व पटकथा मोहित वीरकर यांनी लिहिली असून, जय तारी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या शेवटपर्यंत या प्लानचा सूत्रधार कोण याचे मनात बांधलेले आडाखे चुकवत एक दमदार प्लान या मंडळींनी आखला आहे. धक्कातंत्राचा वापर करीत संशयाचा काटा सतत फिरता राहील याची दक्षता त्यांनी घेतली असली, तरी या धावत्या चक्रामुळे एकूण गूढ फारच ताणले गेले आहे.
हा सगळा पदार्फाश चित्रपटाच्या अखेरच्या काही वेळात होत असल्याने या कोलांटउड्या जरा जड झाल्या आहेत. यातले काही प्रसंग विचार करण्यास भाग पाडतात आणि चित्रपटातली गाणी पार अनावश्यक वाटतात. परंतु असे असले तरी या ‘सुपर्ब प्लान’मध्ये उत्कंठा वाढवत खिळवून ठेवण्याची कामगिरी मात्र त्यांनी केली आहे.
सत्यानंद गायतोंडे (विक्रांत राजे), तृप्ती भोईर (संजना), गिरीश परदेशी (अंकुश), नयना मुके (कामिनी) या व्यक्तिरेखांवर चित्रपटाचा डोलारा उभा आहे आणि या कलाकारांनी तो बऱ्यापैकी तोलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: तृप्ती भोईरने तिच्या अनुभवाच्या जोरावर यात आवश्यक ते रंग भरून चित्रपट सावरण्याची उचललेली जबाबदारी महत्त्वाची आहे. इन्स्पेक्टर शिंदेंची भूमिका राजेंद्र शिसतकर यांनी कडक साकारली आहे व त्यांचा हा इन्स्पेक्टर लक्षात राहतो. एकूणच एक डोकेबाज व मती गुंग करणारा अनुभव घ्यावासा वाटत असल्यास मात्र हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Web Title: Confusing game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.