कॉम्प्युटर इंजिनीअरला सुचला ‘शॉर्टकट’
By Admin | Updated: August 5, 2015 00:49 IST2015-08-05T00:49:13+5:302015-08-05T00:49:13+5:30
कॉम्प्युटर इंजिनीअर असल्याने इंटरनेटचा होत असणारा अतिवापर, निर्माण झालेले प्रचंड अॅडिक्शन पाहून कॉम्प्युटर इंजिनीअर असणारे हरीश राऊत यांना ‘शॉर्टकट - दिसतो

कॉम्प्युटर इंजिनीअरला सुचला ‘शॉर्टकट’
स्वत: कॉम्प्युटर इंजिनीअर असल्याने इंटरनेटचा होत असणारा अतिवापर, निर्माण झालेले प्रचंड अॅडिक्शन पाहून कॉम्प्युटर इंजिनीअर असणारे हरीश राऊत यांना ‘शॉर्टकट - दिसतो पण नसतो’ या चित्रपटाची कथा सुचली. सायबर क्राइम या ज्वलंत विषयावरील हा चित्रपट शुक्रवारी पडद्यावर येत आहे.
संपूर्ण जगाला इंटरनेटने वेड लावले आहे. जितके फायदे तितकेच तोटेही आहेत. गुन्हेगारीमध्ये सध्या ‘सायबर क्राइम’ नवा शब्द समाविष्ट झाला आहे. या विषयावरील ‘शॉर्टकट - दिसतो पण नसतो’ चित्रपटाविषयी सध्या तरुणाईमध्ये खूप उत्सुकता आहे. वेगळ्या विषयाबरोबरच चित्रपटाचा लूक अत्यंत फ्रेश असून, संगीतही तरुणांना ठेका धरायला लावत आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हरीश राऊत याबाबत ‘सीएनएक्स’शी बोलताना म्हणाले, की हा चित्रपट मी हिंदीत करणार होतो; पण मराठी चित्रपटांकडे माझे लक्ष वळले व नवनवीन विषय मराठीत येत असतानाच आपणही आपला नवा विषय मराठीतच मांडायचा, असे ठरवले. माझी तयार असलेली हिंदी स्क्रिप्ट मराठीत बदलली.
एका कमी बोलणाऱ्या, कॉलेजात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणाला आपलं मित्रांत नाव व्हावं, असं खूप वाटतं असतं. तसा तो मध्यमवर्गीय घरातला साधासुधा मुलगा; परंतु त्याला हॅकिंग मात्र चांगलं जमत असतं. मात्र त्याची थांबण्याची तयारी नसते. आजकालच्या मुलांना सगळं झटपट हवं असतं. शॉर्टकटला भुलतात आणि आयुष्यात घोडचूक करतात. म्हणूनच नाव आहे ‘शॉर्टकट - दिसतो पण नसतो.’
राऊत म्हणाले, की चित्रपटात खूप तांत्रिक गोष्टी नसून सस्पेन्स, लव्ह, थ्रिलर या सगळ्यांचा मेळ साधणारा हा चित्रपट आहे. मराठी चित्रपटात अभिनेत्यांची फार पुनरावृत्ती होताना दिसते. मला एका हीरोपेक्षा कॉलेजचा, माझ्या रोलला साजेसा व हटके चेहरा हवा होता, म्हणून वैभव तत्त्ववादीला मी रोहित प्रधानच्या भूमिकेत घेतले. संस्कृती बालगुडेही यापूर्वी कोणत्या ग्लॅमरस रोलमध्ये दिसली नव्हती. मात्र यामध्ये ती अगदी ग्लॅमरस भूमिकेत दिसतेय, तेही प्रेक्षकांना आवडेलच. यातील सहा गाण्यांना सहा वेगळ्या संगीतकारांनी संगीत दिले आहे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
- मधुवंती आचार्य