अजान वादप्रकरणी आशा भोसलेंचा सोनूच्या "सुरात सूर"
By Admin | Updated: April 25, 2017 10:51 IST2017-04-25T10:19:40+5:302017-04-25T10:51:13+5:30
"मशिदीवरील भोंग्यामुळे झोप मोड होते", असे वादग्रस्त ट्विट करणा-या गायक सोनू निगमच्या समर्थनार्थ सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले मैदानात उतरल्या आहेत.

अजान वादप्रकरणी आशा भोसलेंचा सोनूच्या "सुरात सूर"
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 25 - "मशिदीवरील भोंग्यामुळे झोप मोड होते", असे वादग्रस्त ट्विट करणा-या गायक सोनू निगमच्या समर्थनार्थ सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले मैदानात उतरल्या आहेत. "मी सोनूसोबत आहे", असे सांगत आशा भोसले यांनी सोनूला आपला पाठिंबा दर्शवला आहे. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कमध्ये बनारसचा "सिटी ऑफ म्युझिक"मध्ये समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने सुरू असलेल्या संगीत महोत्सवात सादरीकरणासाठी आलेल्या आशा भोसले यांनी बाबा विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेत तेथे विधिवत पूजा केली.
विश्वनाथ मंदिरातील पूजेनंतर मीडियासोबत बोलताना आशाताई म्हणाल्या की, "सोनू गायकीशी जोडला गेलेला आहे. तो माझा गाणारा मित्र आहे आणि वयोमानानुसार तो माझ्या मुलाप्रमाणे आहे, यामुळे मी सोनूसोबत आहे."
अजान वादप्रकरणी काहींनी सोनूला पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी विरोध.
कंगना राणौतची अजान वादात उडी
मी कोणाच्यावतीने बोलणार नाही पण अजान मला आवडते. मी लखनऊमध्ये शुटिंग करत असताना मशिदीमधून दिल्या जाणा-या अजानचा आवाज मला आवडायचा. गुरुव्दारा, मंदिर किंवा मशिदीमध्ये होणारे धार्मिक कार्य मला आवडते. मी या सर्व ठिकाणी गेली आहे. आपण ख्रिश्चनांच्या प्रार्थनेलाही जातो असे कंगनाने म्हटले आहे. अजानबद्दल माझे हे व्यक्तीगत मत आहे पण म्हणून सोनू निगम जे म्हणतोय ते चुकीचे आहे, त्याचा विचार करू नये असे मी म्हणणार नाही. त्याचे ते वैयक्तिक मत आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. यावर चर्चा झाली पाहिजे असे कंगनाने सांगितले.
सोनू निगमच्या वादग्रस्त ट्विटनंतर प्रियांका चोप्राचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा अजानबद्दल बोलत आहे. गंगाजल चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी शेअर करत प्रियांका चोप्रा सांगत आहे की, "संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर छतावर बसून मी अजान ऐकत असे. मला त्यामुळे खूप शांती मिळत असे". प्रियांकाने सांगितल्यानुसार अजान तिच्या कानामध्ये संगीताप्रमाणे वाजायचं.
सोनू निगमवर लष्कर न्यायालयात खटला
गायक सोनू निगम (अंधेरी, मुंबई) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लष्कर न्यायालयात त्यांच्यावर खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल वाय. पी. पुजारी यांच्या न्यायालयाने २४ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे. अन्वर हुसेन बुडन शेख (बोपोडी) यांनी अॅड. वाजेद खान (बीडकर) यांच्यातर्फे हा खटला दाखल केला असून भारतीय दंडविधानाच्या कलम १५३ ए आणि २९५ ए नुसार हा खटला दाखल करण्यात आला असून त्याचा क्रमांक १२९३/१७ आहे.
नेमके काय केले होते सोनूनं ट्विट?
सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनं 17 एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवत ट्विट केले होते. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?", असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. या ट्विटवरुन कुणी सोनूचे समर्थन केले तर काहींनी त्याला खेडबोल सुनावले.
आशा भोसले यांनी केली पंतप्रधान मोदींची स्तुती
दरम्यान,आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं कौतुक करत सांगितले की, "जो नेता आज देशाला मिळाला आहे तो 50 वर्षांपूर्वी मिळायला हवा होता. जर असे झाले असते तर देशाची दिशा आणि दशा, दोन्ही गोष्टी ठिक असत्या".
काशी घाटाबाबत चर्चा करताना त्या म्हणाल्या की, "येथील साफसफाई पाहून कामकाज जलदगतीनं सुरू असल्याचे दिसत आहे आणि देशातील होणारी कामं काशी घाटाच्या स्वच्छतेच्या उदाहरणावरुन दिसत आहे".