राज की बात...

By यदू जोशी | Published: March 31, 2024 02:47 PM2024-03-31T14:47:11+5:302024-03-31T14:47:46+5:30

Lok Sabha Election 2024: राज श्रीकांत ठाकरे. ठाकरे राघराण्यातला आक्रमक नेता. भाऊबंदकीचा शाप तसा आपल्या संस्कृतीत महाभारतापासूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातही तो पोहोचला.

Raj Ki Baat... | राज की बात...

राज की बात...

- यदु जोशी
राज श्रीकांत ठाकरे. ठाकरे राघराण्यातला आक्रमक नेता. भाऊबंदकीचा शाप तसा आपल्या संस्कृतीत महाभारतापासूनच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातही तो पोहोचला. राज यांनी कृष्णकुंजवरून (आताचे शिवतीर्थ) हाक देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. लोकांना खेचून घेणारे वक्तृत्व, बाळासाहेबांची हुबेहूब शैली, बातम्यांमध्ये राहण्याचे साधलेले अचूक कसब, आक्रमक स्वभाव ही या नेत्याची गुणवैशिष्ट्ये. त्याचवेळी सातत्याचा अभाव, भूमिकांमधील विरोधाभास हे अवगुणही. 'मला तुम्हाला काही सांगायचे आहे' असे म्हणत मनसैनिकांना एकदा वरळीच्या जांबोरी मैदानावर बोलविले अन् जाहीर केले, 'मी निवडणूक लढणार आहे', पण मागे फिरले. एकदा मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा केली अन् पुढे प्रहारही केले.

राज यांच्यात ठाकरेशैली अगदी ठासून भरलेली. व्यंगचित्रातून फटके लगावण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी आहेच. शिवसेना म्हणजे बाळासाहेब असे समीकरण वर्षानुवर्षे असले तरी सुप्रसिद्ध संगीतकार असलेले त्यांचे बंधू आणि राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे बाळासाहेबांच्या यशात मोठे योगदान होतेच. दोन सख्ख्या भावांनी एकमेकांना साथ दिली, पण उद्धव अन् राज यांनी ती एकमेकांना दिली नाही. दोघांचे नाते जरा हटके. दोघे एकमेकांचे सख्खे चुलतभाऊ आणि सख्खे मावसभाऊदेखील. एक भाऊ आज फुटलेला पक्ष सावरतो आहे, दुसरा चाचपडतोच आहे. सुरुवात धडाक्यात केली होती, पण मग ग्रहण लागले; माणसे सोडून गेली. राज यांची राजकीय बॅटिंग कशी असते? ट्वेंटी- ट्वेंटीमधील पॉवरप्लेसारखी. उभे आडवे  शॉट्स मारायचे; लागले तर जमले. दोन-चार ओव्हर खेळून आऊट व्हायचे. आरंभशूरपणा हा त्यांचा आणखी एक दोष. त्यांच्यावर आणखी एक आरोप होत आलाय की, ते त्यांचा वापर होऊ देतात आणि त्यांच्या काही कृती या आरोपाला बळ देत आल्या आहेत. दुसऱ्याला बळ देण्याच्या नादात ते स्वबळ तयार करायला त्यांना वेळ मिळत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'लावा रे तो व्हिडिओ'म्हणत राज यांनी भाजप- शिवसेना, मोदी-शहांवर हल्लाबोल केला. स्वतःचा पक्ष मात्र निवडणुकीतच उतरविला नाही. बंदूक ठेवण्यासाठी राज यांनी आपल्या खांद्याचा वापर होऊ दिला, त्या गडबडीत पक्षवाढीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.

रुबाबदार व्यक्तिमत्त्व हा या नेत्याचा यूएसपी, पण वाढत्या वयाबरोबर तो जरा कमी झालाय. एरवी कोणी बोलायला दहावेळा विचार करेल अशा विषयावर राज बिनधास्त बोलतात. त्यांचे असे बोलणे तरुणाईला भावते. प्रचंड मॅग्नेट असलेल्या या नेत्याच्या सभेला हजारोंची गर्दी आजही होते. आजच्या आणि उद्याच्याही पिढीला ते कनेक्ट होतात, पण हे कनेक्ट होणे मतपेटीत रूपांतरित होत नाही. या रूपांतरासाठी आधी त्यांचे लढणे गरजेचे आहे. यावेळी ते भाजपच्या साथीने लढतील की लोकसभेला जागा न घेता विधानसभेत वाटा मागतील? ही 'राज'की बात सध्या गुलदस्त्यात आहे, लवकरच ती समोर येईल. राज यांची उमर आता पचपन की झाली आहे, आणखी वीस वर्षे तरी ते राजकीय बॅटिंग करू शकतात. त्यांच्या शिवतीर्थ या बंगल्यासमोरच शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर वर्षभर क्रिकेट चाललेले असते. त्याला साक्षी ठेवून राजकारणातील बाऊन्सर्स, गुगली असे सगळे ते दिमाखात टोलावतील की हिटविकेट होत राहतील?

Web Title: Raj Ki Baat...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.