नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी: दोन नेते, दोन वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 08:01 AM2024-05-16T08:01:24+5:302024-05-16T08:02:09+5:30
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघांनीही माध्यमांशी संपर्काच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. यामागे काय अर्थ असावा?
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या जनसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी आक्रमक प्रसिद्धीचे धोरण अवलंबिले असेल तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नेमके उलट आहे. एकीकडे आघाडीच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रांना, दूरचित्रवाणी वाहिन्यांना मोदी मुलाखती देत आहेत, तर राहुल गांधी यांनी माध्यमांना चार हात दूरच ठेवण्याचे ठरवले आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीनंतर वाराणसी, पाटणा आणि इतरत्र पंतप्रधानांनी टीव्ही वाहिन्यांच्या वार्ताहरांना रोडशोच्या वेळी छोट्या बाईट्स दिल्या. राहुल गांधी यांनी मात्र माध्यमांना जवळपास फिरकू दिलेले नाही.
मोदी यांनी पत्रकारांना त्यांच्या रथावर खुलेआम चढू दिले; ते त्यांच्याशी बोलले. राहुल गांधी यांना त्यांच्या माध्यम कक्षाकडून असेच करायला सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी अजिबात ते ऐकले नाही. प्रचंड फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना पंतप्रधानांनी स्वत: बोलावून घेतले आणि आपल्या कामाबद्दल त्यांच्याशी बोलून यथेच्छ प्रसिद्धी मिळवली. राहुल गांधी यांनी मात्र असे संवाद पूर्णपणे टाळले. त्यांनी अनेक युट्युबर्स आणि इतर इन्फ्लुएन्सर्सना तीन - चार गटांमध्ये भेट दिली. पण, तो संवाद खासगीत राहावा आणि काहीही प्रसिद्ध करू नये, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली, असे म्हणतात.
निवडणूक जवळपास अंतिम टप्प्यात पोचत आली, तरी राहुल यांनी अद्याप एकही सविस्तर मुलाखत दिलेली नाही. निवडणूक प्रचाराच्या वेळी जाता जाता दिलेल्या ‘बाईट’ सोडल्या तर प्रियांका गांधी वद्रा यांनीही अद्याप रीतसर मुलाखती दिलेल्या नाहीत. हे काम पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश किंवा इतरांवर सोपवण्यात आले आहे.
पडद्यामागचा खेळ सुरू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेऊन सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना दिल्लीत पाठवले आहे. अलीकडेच त्यांची सहकार्यवाहपदी तीन वर्षांसाठी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. होसबळे यांचा मुक्काम लखनौमध्ये होता. आता दिल्लीत राहून २०२७ पर्यंत ते सरकार्यवाह पदाचे काम पाहतील. संघातील अधिकारपदांच्या उतरंडीत सहकार्यवाह हे दुसऱ्या क्रमांकाचे पद मानले जाते. येणाऱ्या काही महिन्यात होसबळे महत्त्वाची भूमिका बजावतील. वेगवेगळ्या प्रश्नांवर भाजप नेतृत्व आणि संघातील गैरसमजुती दूर करणे, हे त्यांचे मुख्य काम असेल. अन्य पक्षांतील अतिशय भ्रष्ट नेत्यांना जवळ करण्यासारख्या काही निर्णयावर संघाची नाराजी असल्याचे अलीकडे दिसून आले होते. याबाबतीत काही मुद्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न १९ एप्रिलला मोदी यांचा रात्रीचा मुक्काम नागपूरला झाला, त्यावेळी करण्यात आला, अशी दिल्लीत चर्चा आहे. चार जूनला निवडणुकांचे निकाल लागतील. त्यानंतर सरकार स्थापनेच्या दृष्टीने भाजपची संघाशी सल्लामसलत करणे वाढेल; म्हणून होसबळे यांचा दिल्लीतील ‘प्रवास’ महत्त्वाचा मानला जात आहे.
योगी आदित्यनाथ पेचात
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अलीकडेच एका राजकीय पेचात सापडले आहेत. ‘२०२५च्या सप्टेंबरमध्ये मोदी ७५ वर्षांचे होतील. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत,’ असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटल्याने हा पेच उद्भवला. भाजपने लोकसभेची निवडणूक जिंकली, तर आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत आणि योगी यांना दिल्लीत आणले जाईल, असेही भाकीत केजरीवाल यांनी केले आहे. त्यानंतर एका खास पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तातडीने खुलासा करावा लागला. ते म्हणाले, “भाजपच्या घटनेत कोठेही कार्यकर्त्याला ७५ गाठल्यावर निवृत्त करण्याची तरतूद नाही!’’ मात्र केजरीवाल यांनी आदित्यनाथ यांच्या विषयी जे विधान केले, त्यावर ते काहीच बोलले नाहीत. कदाचित त्यांनी तो विषय पंतप्रधानांवर सोडून दिला असावा.
वास्तविक पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर त्यांचा नेहमीचा शिरस्ता मोडून योगी आदित्यनाथ यांच्यावर काही प्रचारसभांमध्ये स्तुतीसुमनांची बरसात केली. योगी यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात विकास झाल्याचेही त्यांनी १४ मे रोजी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. ‘उत्तर प्रदेशातील लोक यापुढे राजकारणातील घराणेशाही स्वीकारू शकत नाहीत; लोकांचे जीवन बदलणारे प्रशासन त्यांनी अनुभवले असून, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कामांनी किती आणि काय फरक पडला, तो स्पष्ट दिसतो आहे,’ असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.