निवडणुकीच्या मैदानात अश्लील व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 08:20 AM2024-03-21T08:20:41+5:302024-03-21T08:21:14+5:30

Lok Sabha Election 2024: निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की, राजकीय नेत्यांचे अश्लील  व्हिडीओ येतात! सध्या भाजपचे दोन खासदार त्यात अडकले आहेत.

Lok Sabha Election 2024: Obscene videos in the election field... | निवडणुकीच्या मैदानात अश्लील व्हिडीओ...

निवडणुकीच्या मैदानात अश्लील व्हिडीओ...

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली)

भाजपच्या दोन खासदारांशी संबंधित प्रसारित झालेल्या दोन अश्लील व्हिडिओंची देशाच्या राजधानीत बरीच चर्चा आहे. बाराबंकी लोकसभा मतदारसंघातून उपेंद्र सिंह रावत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांच्याशी संबंधित व्हिडीओ झळकला. हा व्हिडीओ बनावट आहे. आपली प्रतिमा हनन करण्यासाठी आणला गेला असल्याचा दावा रावत यांनी केला असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्रथमदर्शनी अहवाल पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. मात्र पुढच्याच दिवशी त्यांनी रिंगणातून माघार घेतली. हा अश्लील व्हिडीओ अधिकृत/सत्य असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. ३ मार्च रोजी प्रसारित झालेल्या या व्हिडीओत रावत दिसतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तत्कालीन खासदार प्रियांका सिंह रावत यांना उमेदवारी नाकारून उपेंद्र सिंह रावत यांना उमेदवार केले गेले होते..

हे चालू असतानाच दुसरा एक व्हिडीओ समोर आला. हरयाणातील सोनीपतमधून निवडून आलेले भाजप खासदार त्यात अडकले आहेत. समाजमाध्यमांवर आलेल्या या व्हिडीओत एक महिला खासदाराकडे कृपादृष्टीची मागणी करत आहे आणि खासदार त्या मोबदल्यात दुसरी मागणी करत आहेत. या प्रकरणातही प्रथमदर्शनी अहवाल दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सोनीपतचे खासदार रमेश कौशिक यांनी हा आपल्याविरुद्ध राजकीय कट असल्याचे सांगून व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे. २०१३ मध्ये  कौशिक भाजपमध्ये आले. राव इंद्रजित, बिरेंद्रसिंग, कुलदीप बिश्नोई यांच्यासारखे इतर ज्येष्ठ काँग्रेस नेतेही त्यावेळी भाजपत आले होते; त्यांना २०१४ साली उमेदवारीही मिळाली होती. २०१९ साली कौशिक यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांचा पराभव केला.  हरयाणातील ताजे तिकीट वाटप अजून जाहीर व्हायचे आहे. कौशिक पुन्हा तिसऱ्यांदा नशीबवान ठरतात का, यावर मात्र प्रश्नचिन्ह लागलेले आहेत. ज्येष्ठ राजकीय नेत्यांचे असे अश्लील व्हिडीओ समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशा प्रकारची दु:साहसे करणाऱ्यांच्या बाबतीत भाजप नेहमीच कठोर वागत आल्याने त्यांना त्याची मोठी किंमतही चुकवावी लागली आहे.

निवडणुकीनंतर नवीन अध्यक्ष
भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची मुदत पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेने फेब्रुवारी महिन्यात चार महिन्यांसाठी वाढवली तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, सत्तारूढ पक्षाला निवडणुकीनंतर नवा अध्यक्ष मिळणार आहे. २०१९ साली अमित शाह हे केंद्रात गृहमंत्री झाल्यानंतर नड्डा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सत्तावर्तुळात चर्चा आहे की, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर कदाचित भाजपचे भावी अध्यक्ष असतील. खट्टर मोदींचे विश्वासू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मोदी काम करत असताना दोघे एकाच खोलीत राहत होते.
हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी खट्टर यांना बसवले गेले ती मोदी यांची निवड होती. राजकीय निरीक्षकांना २०१४ साली त्याचे आश्चर्य वाटले होते. खट्टर यांच्यामागे पुरेसा प्रशासकीय अनुभव आहे. मोदी यांच्या पुढच्या मंत्रिमंडळातही ते येऊ शकतील. परंतु, मोदी यांना पक्ष चालवण्यासाठी त्यांचा विश्वासू माणूस हवा आहे. अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह या पक्षाच्या माजी प्रमुखांप्रमाणेच नड्डा यांनाही मंत्रिमंडळात घेतले जाऊ शकते.

हरयाणातला नमुनेदार पेच
 हरयाणात नव्याने नेमले गेलेले मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे आमदार नाहीत. त्यांना सप्टेंबरपूर्वी विधानसभेची जागा मिळवावी लागेल. मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाल विधानसभेची जागा मोकळी होऊन तेथे पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे. हरयाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपते. त्यामुळे सैनी यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. खट्टर यांना कर्नाल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

धीर धरल्याचे फळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमची गाठ पडणार असेल तर तुमच्यात वाट पाहण्याची प्रचंड ताकद असावी लागेल. लोकांची निष्ठा जोखण्याचे अनेक निकष त्यांच्याकडे आहेत. हवे तर चिराग पासवान यांना विचारा. पिता रामविलास पासवान यांचा वारसा आपोआपच त्यांच्याकडे आला. ८ ऑक्टोबर २०२० ला रामविलास यांचे निधन झाले. मात्र चिराग यांना मंत्री केले गेले नाही. त्यांचा बंगलाही काढून घेण्यात आला. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत केली होती. त्यावेळी जनता दल संयुक्त तीन नंबरवर फेकले गेले होते. असे असूनही हे घडले आणि ते पुरेसे नव्हते म्हणून की काय ज्यांच्याशी त्यांचे पटत नाही, असे त्यांचे काका पशुपती पारस यांचा जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मात्र चिराग पासवान शांत राहिले. त्यांनी  चकार शब्द गेल्या तीन वर्षांत उच्चारला नाही. आता लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि चिराग पासवान यांना जे हवे ते मिळाले. लोकजनशक्ती पक्षाच्या  वाट्याच्या बिहारमधल्या पाचही लोकसभा मतदारसंघांत त्यांच्या पसंतीचे उमेदवार असतील. मोदी यांनी पशुपती पारस यांना बाजूला सारले. चिराग पासवान किती धीर धरू शकतात, हे मोदी यांना जोखायचे होते. पासवान यांच्या मतपेढीतील सहा टक्के मते चिरागकडे जातील, काकांकडे जाणार नाहीत हेही मोदी यांना ठाऊक आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024: Obscene videos in the election field...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.