Gondagaon Mutti Bandur .. .. | गौडगाव मुत्त्या बंदरु.. ..मामांचा माढा दादांचाच !
गौडगाव मुत्त्या बंदरु.. ..मामांचा माढा दादांचाच !

 

- सचिन जवळकोटे

गेल्या महिन्यात लोकसभेचं मतदान झाल्या-झाल्या सोलापूर अन् माढ्याच्या निकालाचा स्पष्ट अंदाज ‘लोकमत’नं व्यक्त केला होता. आज अखेर तोच खरा ठरला. ‘कपबशी खळखळली.... हात थरथरला,’ हे सोलापुरात शंभर टक्के खरं ठरलं. आंबेडकरांनी जेवढी मतं घेतली, तेवढ्याच फरकानं सुशीलकुमार मागं पडले. ‘मामांच्या माढ्यात दादांचीच दादागिरी,’ हेही भीमा-सीना खो-यात स्पष्ट झालं. माढा, करमाळा अन् सांगोल्याचा लीड तोडायला अकलूजचे ‘दादा’च मदतीला आले. अखेर इथं चालली फलटणच्या रणजितदादांचीच दादागिरी.

साहेब’ का चालले नाहीत ?

सुशीलकुमारांची राजकीय कारकीर्द जेव्हा उदयाला आली होती, तेव्हा ‘सोलापूरचे सुपुत्र’ अशी त्यांची आपुलकीची ओळख सोलापूरकरांमध्ये होती. कालांतरानं वर्षानुवर्षे ‘लाल बत्ती’च्या गाडीत बसल्यामुळं सर्वसामान्यांसोबतचा हक्काचा संवाद हळू-हळू तुटत गेला. दोघांमध्ये काळ्या गाडीची काळी काच अभेद्य भिंत बनून राहिली. यावर खुद्द वाघोलीच्या लक्ष्मणरावांनीही निवडणुकीच्या काळात खोचक टिप्पणी केलेली. असो.... याच गाडीत ते ‘सुपुत्र’चे ‘साहेब’ बनले.


यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोरचे दोन्ही प्रमुख उमेदवार तसे सोलापूरकरांसाठी तसे नवे होते. परके होते. त्यांचा अत्यंत खुबीनं असा वापर ‘हात’ वाल्यांना करता आला असता. ‘आपला माणूस’ या इमोशनल प्रचारातून लोकांच्या काळजाला हातही घालता आला असता; मात्र सुशीलकुमारांचे ‘प्रोफेशनल चेले’ही पडले सुटाबुटातले. त्यांनी ‘आपले साहेबऽऽ’ हीच टॅगलाईन वापरली. त्यांच्या साहेबांना त्यांनी ‘केबिन’ मधल्या साहेबांच्याच जागी ठेवलं. ‘सर्वसामान्य सोलापूरकरांचा हक्काचा माणूस’ ही भावनाच त्यांना लोकांमध्ये रुजविता आली नाही. आलेली संधी गमावली; कारण त्यांना सोलापूरकरांची आत्मीयताच नाही समजली. 
 मतदारांसोबतचा ऋणानुबंध केवळ निवडणुकीपुरताच नसतो. विजयी व्हा अथवा पराभूत... पाच वर्षे नेत्यानं जनतेच्या सुख-दु:खात सहभागी झालंच पाहिजे, ही आपल्या भारतीय लोकशाहीतील साधी सरळसोट अपेक्षा. कदाचित हाच सूचक संदेश यंदाच्या निवडणुकीत सोलापूरकरांनी दिलाय. साडेचार वर्षे परगावी राहून शेवटच्या सहा महिन्यात जनतेशी साधला गेलेला संवाद क्षणभंगूरच ठरतो, हेच इथं सिद्ध झालंय. भलेही सुशीलकुमार प्रचाराच्यावेळी रिक्षात बसले असतील. पहाटे किल्ला परिसरात लोकांसमवेत चालले असतील; परंतु तरीही ते निवडणुकीत चालले नाहीतच.


सुशीलकुमारांनी काय गमावलं.. बाळासाहेबांनी काय कमावलं ?
सुशीलकुमारांची ही दुसरी हार. गेल्यावेळी ते मोदी लाटेत पराभूत झाले. यावेळी ते मतविभागणीमुळे खासदारकीपासून ‘वंचित’ ठरले. त्यांची वर्षानुवर्षे हक्काची मतं एका क्षणात ‘कप-बशी’मय झाली. ही अनाकलनीय प्रक्रिया समजून घेण्यात काँग्रेसवाले नेमकं कुठं कमी पडले, याचं आत्मचिंतन करणंही अत्यंत गरजेचं. ‘आंबेडकर आपल्या विरोधात उभे राहिले म्हणजे त्यांनी लोकशाहीचा खूनच केला,’ असं म्हणत उर बडवून थोडीच लोकांची सहानुभूती मिळाली ? थोडीच मतं प्राप्त झाली ? यामुळं उलट गावकुसाबाहेरची आहे ती आपुलकीही लुप्त झाली; मात्र यंदा अजून एक स्पष्ट झालं. विजापूर वेशीचा जुना जिव्हाळा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. ‘मिमसाब हैदराबादकर’ यांच्या भरगच्च सभेनंतरही ‘बेस का मतदान’ हातालाच दिल खोल के झालं. हेही नसं थोडकं.
बाळासाहेबांनी भलेही अकोल्यातून इथं येऊन लोकसभेची निवडणूक लढविली असली तरी त्यांच्या पक्षाचं पुढचं ध्येय म्हणे विधानसभा. यंदा भलेही त्यांना विजय प्राप्त झाला नसला तरी या निमित्तानं प्रत्येक तालुक्यात त्यांची स्वत:ची हक्काची निर्माण झालेली ‘व्होट बँक’ येणार विधानसभेला नक्कीच कामाला. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या उमेदवारीनंतर धाकट्यापासून थोरल्या राजवाड्यापर्यंत सर्व गटा-तटांचं जे झपाट्यानं ध्रुवीकरण झालं, त्यामुळं झपाट्यानं बदलली सोलापुरातील आगामी राजकारणाची समीकरणंही. चंदनशिवेंसारखी मंडळी विधानसभेच्या उमेदवारीपासून ‘वंचित’ राहणार नाहीत, हेही झालं स्पष्ट.


बिच्चाºया ‘शिंदें’ना बनवलं ‘मामा’
माढ्यात ‘संजयमामां’नी खरोखरच जोरदार लढत दिली. मोदींची सभा होऊनही पहिल्या काही फेºयांमध्ये त्यांनी अकलूजकरांपासून साºयांनाच घाम काढायला लावला; मात्र त्यांच्याच पट्ट्यानं त्यांना दिली नाही साथ. पाच-पाच कारखाने असूनही ऊस कडूच ठरला; कारण त्यांचं मीठच म्हणे निघालं अळणी. माढा-करमाळा तालुक्यात अजून किमान वीस-पंचवीसचं लीड अधिक मिळालं असतं तर कदाचित निकाल म्हणे वेगळा लागला असता; परंतु करणार काय? खºया-खुºया शत्रूपेक्षा दोस्तीतल्या दुश्मनांची छुरी नेहमीच धारदार, हे आम्ही पामरानं ‘लगाव बत्ती’ मधून अनेकवेळा सांगितलेलं, पण कोणतीच गोष्ट ‘मामां’नी कधी सिरियसली म्हणे न घेतलेली. ‘बारामतीकरांं’चा अभेद्य बालेकिल्ला असणाºया माढ्यात मामांचा पराभव ‘कमळ’ वाल्यांनी नव्हे तर त्यांच्याच एकेकाळच्या ‘जिगरी’ मित्रांनी केलाय, यात शंकाच नाही. खासदारकी गेली.. आमदारकी गेली.. हाती झेडपीची खुर्ची राहिली, हेही नसे थोडके... परंतु, आता ती तरी राहणार का नाही, शोध घ्यायलाच हवा मामा ! (क्रमश:)

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)


Web Title: Gondagaon Mutti Bandur .. ..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.