‘अंबरनाथ पॅटर्न’ आणि वाघ-बकरीचे एकत्र जेवण!
By यदू जोशी | Updated: January 9, 2026 04:35 IST2026-01-09T04:35:17+5:302026-01-09T04:35:32+5:30
अंबरनाथमध्ये काँग्रेसचे बाराही नगरसेवक भाजपमध्ये गेले. अकोटमध्ये तर अफलातून प्रयोग झाला. हा फक्त ‘ट्रेलर’ आहे, ‘पिक्चर’ अजून बाकी आहे!

‘अंबरनाथ पॅटर्न’ आणि वाघ-बकरीचे एकत्र जेवण!
यदु जोशी, राजकीय संपादक, लोकमत
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून गेले, महापौरांची निवडणूक नगरसेवकांमधून होणार आहे. त्यामुळे निकालानंतर अजब-गजब समीकरणे उदयास येऊ शकतात. महापौर, उपमहापौर, तिजोरीच्या चाव्या असलेली स्थायी समिती एकमेकांमध्ये वाटून घेण्यासाठी वाघ आणि बकरी एकाच ताटात जेवताना दिसू शकतात. वाघ बकरीला खाणार नाही, बकरी वाघाला घाबरणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिकांचे पदाधिकारी निवडण्यासाठी एक वेगळीच निवडणूक होऊ शकते. लोकशाहीचा महापालिका उत्सव संपल्यानंतर अंकगणिताचा हिशेब सुरू होईल. अगदी भाजप-एमआयएम अशी युती होणार नाही; पण बाकी काहीही होऊ शकते.
‘जे नेहमीसाठीच विरोधक आहेत अशांना कोणत्याही महापालिकेत सत्तेसाठी सोबत घेणार नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे; पण असे बघा की विरोधी पक्षातील सगळे नगरसेवकच अंबरनाथप्रमाणे एखाद्या महापालिकेतही भाजपमध्ये गेले तर? ते तर चालेलच ना! कारण ती काँग्रेसशी केलेली युती नसेल, काँग्रेसजनांच्या हातात कमळ देऊन केलेली अनोखी युती असेल. निकालानंतर काही महापालिकांमध्ये तसे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अर्थाने ‘अंबरनाथ पॅटर्न’ची पुनरावृत्ती काही महापालिकांत होऊ शकेल. मुंबईत एकमेकांचे राज्य खालसा करायला निघालेले पक्ष एकाच मांडवात दिसू शकतात. ‘मी माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेत बसवीनच’ असा शब्द दिला होता, असे म्हणत काही नेते सत्तेसोबत जाऊ शकतात.
अंबरनाथमध्ये नाट्य घडले. भाजप-काँग्रेसच्या नगरसेवकांची युती झाली. साधारणत: महाविकास ‘आघाडी’ आणि महा‘युती’ असे शब्द माध्यमे वापरतात. अंबरनाथमध्ये झाले त्याला काय म्हणायचे?... ‘युघाडी’! बरं ही युघाडीही काही तासच टिकली. काँग्रेसचे बाराही नगरसेवक भाजपमध्ये गेले. अकोटमध्ये भाजप-एमआयएम-दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना, सोबत बच्चू कडू असा अफलातून प्रयोग झाला. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है... असे बरेचसे पिक्चर महापालिका निवडणुकीनंतर बघायला मिळतील. त्यातील एक-दोन तर अत्यंत धक्कादायक असू शकतील. राजकारण काही सुधारत नाही, आणखी बिघडेल. तसेही सत्तेच्या खुर्चीत बसण्याची तीव्र इच्छा असलेल्या नेत्यांच्या चष्म्यातून सगळे रंग सारखेच दिसत असतात.
काँग्रेससाठी विशेष सूचना - महापालिकेत जिंकलेले तुमचे नगरसेवक रात्रीतून कमळ हातात घेऊ शकतात, सावधान! फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रवेशाध्यक्ष’ (सॉरी प्रदेशाध्यक्ष) रवींद्र चव्हाण, माजी प्रवेशाध्यक्ष (माजी प्रदेशाध्यक्ष) चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे काहीही करू शकतात.
अजित पवार दुरावले
मध्यंतरी एक टप्पा असा आला होता की, एकनाथ शिंदे यांचे रुसवेफुगवे वाढले होते, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खटकेही उडाले त्यांचे देवेंद्र फडणवीसांशी, त्याच्या बातम्याही झाल्या. या दोघांचे एकमेकांशी फारसे पटत नाही; पण फडणवीस आणि अजित पवार यांची जवळीक खूपच वाढली आहे, असेही चित्र होते. शिंदेंपेक्षा अजित पवार हे भाजपवाल्यांना अधिक विश्वासार्ह वाटू लागले होते. मात्र, महापालिका निवडणुकीत अजितदादांपेक्षा शिंदे भाजपच्या अधिक जवळ दिसत आहेत. शेवटी बालमित्र वेगळा आणि नोकरीचाकरी करताना बनलेला मित्र वेगळा. तसेही फडणवीस एकदा म्हणालेच होते की, शिंदेंच्या शिवसेनेशी आमची नैसर्गिक युती आहे, तर राष्ट्रवादीशी राजकीय युती आहे. २०२३ मध्ये अजित पवार यांना सोबत घेतल्याने आपल्याच पक्षावर प्रचंड नाराज असलेल्या भाजपच्या कट्टर मतदाराने गेल्या अडीच वर्षांत हळूहळू त्यांना स्वीकारणे सुरू केले होते. ते त्यांच्याबाबत पूर्वीइतके कडवट राहिलेले नव्हते. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या निमित्ताने हा कडवटपणा वाढला आहे.
‘काका, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?’ असा सवाल करणाऱ्या अजित पवारांचा प्रवास ‘पुढच्या पिढीला पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाची गरज आहे’, असे म्हणण्यापर्यंत आला आहे, पुढे काय होईल ते निकालानंतरच कळेल. एक मात्र नक्की की, शरद पवार यांच्या पक्षासोबत ते अधेमधे राहतील की, दोन पक्षांचे विलीनीकरण होईल की, अजिबात संबंध ठेवणार नाहीत याची स्पष्टता लवकरात लवकर आणणे हे त्यांच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने आवश्यक असेल.
कारण त्यांच्या राजकारणाची दिशा अजूनही धूसर आहे आणि धूसरता राजकारणात धोकादायक असते. शरद पवार यांच्याशी अधेमधे राहणं हा पर्याय नाही; तो फक्त अनिर्णयाचा मुखवटा आहे. विलीनीकरण, अंतर की संघर्ष- यापैकी एक निवड अपरिहार्य आहे. कारण राजकारणात मधोमध उभे राहिलात तर दोन्हीकडून गोळी मारली जाण्याचीच शक्यता अधिक.
yadu.joshi@lokmat.com