मला ज्या दिवशी बोलायचं असेल तेव्हा...; मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तानाजी सावंतांचं निवेदन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:37 IST2024-12-16T16:34:41+5:302024-12-16T16:37:36+5:30

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत तूर्तास सावंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन केलं आहे.

shiv sena mla Tanaji Sawant statement after being dropped from the cabinet | मला ज्या दिवशी बोलायचं असेल तेव्हा...; मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तानाजी सावंतांचं निवेदन!

मला ज्या दिवशी बोलायचं असेल तेव्हा...; मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तानाजी सावंतांचं निवेदन!

Shiv Sena ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे अधिवेशन सोडून ते अचानक पुण्याला निघून आल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रसारमाध्यमांकडून आमदार सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत तूर्तास सावंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन केलं आहे.

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवदेनात प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हटलं आहे की, "तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या आपल्या माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यावरून सातत्याने सावंत साहेबांशी प्रतिक्रिया आणि बाईटसाठी विचारणा केली  जात आहे. आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की, सावंत साहेबांना ज्यादिवशी या सगळ्याबाबत बोलायचे आहे, त्यादिवशी आपल्या सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल. तोपर्यंत कृपया कुणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये, ही विनंती. आज संध्याकाळीही सावंत साहेब बाईटसाठी उपलब्ध नसतील, याची कृपया नोंद घ्यावी," अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्याच्या पदरी निराशा

महायुतीला मिळालेल्या दमदार यशानंतर जिल्ह्याला पुन्हा एकदा मंत्रिपद लाभेल, अशी आशा जिल्हावासीयांना होती. मात्र, यावेळी पदरी निराशा पडली असून, होते तेही गमावून बसण्याची वेळ जिल्ह्यावर आली. धाराशिव जिल्ह्यातून महायुतीच्या वाट्याला दोन आमदार आले आहेत. यांतील एक जागा काठावर निघाली, तर दुसरी विक्रमी मतांनी. असे असले तरी मावळत्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले तानाजी सावंत हे पुन्हा मंत्रिपदी विराजमान होतील, अशी आशा समर्थकांना होती. शिवाय, जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा कमळ फुललेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना भाजप पक्षविस्ताराच्या अनुषंगाने संधी देईल, अशीही अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही अशा फोल ठरल्या. त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरचा पालकमंत्री जिल्ह्याला स्वीकारावा लागणार आहे.  

पालकमंत्री भाजपचा की शिवसेनेचा ? 

महायुतीची सत्ता असताना जिल्ह्याला पालकमंत्री हे शिवसेनेचे राहिले आहेत. २०१४ ते २०१९ या काळात सेनेचे बाहेरचे पालकमंत्री लाभले. २०२२ ते २०२४ या काळात स्थानिक पालकमंत्री मिळाले. आता यावेळी बाहेरचे पालकमंत्री असणार, हे निश्चित असले तरी ते सेनेचे असतील की भाजपचे, याची उत्कंठा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना लागली आहे. 
 

Web Title: shiv sena mla Tanaji Sawant statement after being dropped from the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.