धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 14:23 IST2024-04-01T14:17:54+5:302024-04-01T14:23:08+5:30
गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता.

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!
- शहाजी फुरडे-पाटील
बार्शी: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. दररोज नवीन नाव चर्चेसाठी पुढे येत होते. मात्र मागील तीन-चार दिवसापासून चर्चेच्या हालचालींना वेग आला. यामध्ये धाराशिव मतदार संघातील प्रमुख नेते मंडळींची उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन दिवस झालेल्या चर्चेनंतर अर्चना पाटील यांचे नाव फायनल झाले. त्यामुळे त्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना लढत देणार आहेत.
अर्चना पाटील यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषवले आहे. मतदारसंघांमध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक आमदार या मतदारसंघात आहे. त्यामुळे समसमान बलाबल असलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपारिक लढत पाहावयास मिळणार आहे.
मतदारसंघांमध्ये असलेले राणा पाटील व माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे वलय व जातीय समीकरणांचा विचार करता अर्चना पाटील हा फ्रेश चेहरा महायुतीने सर्व बाजूंचा मैदानात उतरवला आहे. त्यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी दुपारनंतर अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल असे खात्रीशीर वृत्त आहे.