कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:33 IST2026-01-13T10:33:05+5:302026-01-13T10:33:42+5:30
Kalyan Air Hostess Suicide Case: प्रेमसंबंध, मारहाण आणि आर्थिक पिळवणुकीच्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले. आरोपी कौशिक पावशे अद्याप फरार.

कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
कल्याण (ठाणे): कल्याण पूर्व परिसरात एका २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. नेहा असे या मृत तरुणीचे नाव असून, तिने प्रेमसंबंधातील छळ, मारहाण आणि आर्थिक पिळवणुकीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा आणि आरोपी कौशिक प्रकाश पावशे यांचे गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नेहाला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर, तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने नेहाकडून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. नेहाची बदली हैदराबादला झाली होती, मात्र तिथेही जाऊन आरोपीने तिला मारहाण केल्याचे पुरावे (बँक स्टेटमेंट आणि व्हॉट्सॲप मेसेज) समोर आले आहेत. १६ आणि २४ डिसेंबर दरम्यान तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते.
नेहाने २८ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपी कौशिक पावशे याला अद्याप अटक झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बिनधास्त फिरत असल्याचे पाहून संतप्त कुटुंबीय आणि परिसरातील महिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर जोरदार धडक दिली.
पोलिसांची कारवाई
नागरिकांचा वाढता दबाव पाहून पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, कौशिकचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्याचे आश्वासन दिले आहे.