पतीकडून सिगारेटचे चटके, परपुरुषाशी संबंध ठेवण्याची बळजबरी अन् सासरा करतो शरीरसुखाची मागणी
By नरेश रहिले | Updated: March 6, 2024 21:04 IST2024-03-06T21:03:00+5:302024-03-06T21:04:31+5:30
गोंदियाच्या मुलीची सासरच्या सात जणांविरुद्ध तक्रार; अमरावती पोलिसांच्या मदतीने ‘ती’ पोहोचली गोंदियात

पतीकडून सिगारेटचे चटके, परपुरुषाशी संबंध ठेवण्याची बळजबरी अन् सासरा करतो शरीरसुखाची मागणी
नरेश रहिले, गोंदिया : रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. परंतु नवरा पत्नीला सिगारेटचे चटके देत परपुरुषाशी संबंध ठेव म्हणायचा तर सासरा तिला शरीर सुखाची मागणी करायचा, त्यांच्या इच्छेप्रमाणे कृत्य केले नाही तर तिला असह्य त्रास द्यायचे. तब्बल आठ महिने त्रास सहन करणारी गोंदियातील मुलगी अमरावती पोलिसांच्या मदतीने गोंदियात पोहोचली. यासंदर्भात अमरावतीच्या सात जणांवर गोंदिया शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया शहरातील २४ वर्षांच्या तरुणीचे लग्न २१ मे २०२३ रोजी रीतीरिवाजाप्रमाणे गोंदिया येथे झाले. लग्न झाल्यानंतर सासरचे मंडळी दोन महिने चांगले राहिले. त्यानंतर पतीने हळूहळू त्रास देणे सुरू केले. तो तिला सिगारेटचे चटके द्यायचा. तिला आपल्या मित्रमंडळींसोबत पाठविण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या या कृत्याला तिने विरोध केला की, नवऱ्यासह घरातील सर्व मंडळी तिला त्रास द्यायचे. तब्बल आठ महिन्यांचा त्रास सहन करीत तिने काढले. त्यांच्या कृत्याची माहिती मावस सासरा व मावस सासू यांना सांगितल्यावर घरचे म्हणतात तसेच तू कर, असेही त्यांनी तिला म्हटले. आठ महिने तिला छळ करणाऱ्या सासरच्या आठ आरोपींवर गोंदिया पोलिसांनी भादंविच्या कलम ४९८ (अ), ३५४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सासरा करायचा बॅड टच
५८ वर्षीय आरोपी सासरा आपल्या सुनेला शरीर सुखाची मागणी करीत तिला बॅड टच करायचा. तिने त्याच्या कृत्याला विरोध केल्यावर सर्व घटना पतीला सांगितल्यावर पतीने तिलाच शिवीगाळ करून मारहाण केली. तिला घरातील सर्वच मिळून त्रास द्यायचे.
तिला दारू पाजायचे अन् घरात कोंडायचे
तिला नवरा सिगारेटचे चटके द्यायचाच; परंतु घरातील मंडळी तिला जबरदस्तीने दारू पाजायचे, घरातील खोलीत कोंडून तिच्यासमोर घाणेरडे कृत्य करायचे, तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने २४ डिसेंबर २०२३ रोजी अमरावतीचे राजापेठ पोलिस स्टेशन गाठले होते. पोलिसांच्या मदतीने तिने माहेर गाठले.