WPL 2026 Anushka Sharma Debut : महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात गुजरात जाएंट्सच्या संघाकडून २२ वर्षीय युवा भारतीय महिला क्रिकेटरला पदार्पणाची संधी मिळाली. संघाने पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अनुष्का शर्मानं यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या खेळीचा खास नजराणा पेश केला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी अवघ्या काही धावांनी हुकली. पण कडक खेळीसह तिने मैफील लुटली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुष्का शर्माचं दमदार पदार्पण, अर्धशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधीत्व करणारी अनुष्का शर्मा ही विराट कोहलीला आयडॉल मानते. फलंदाजी वेळी तिच्यात किंग कोहलीच्या बॅटिंगची झलकही दिसली. तिने कर्णधार अॅश्ली गार्डनरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पहिला WPL सामना खेळणाऱ्या अनुष्का शर्मानं ३० चेंडूत ४६ धावांची खेळी केली. या खेळीत तिने ७ चौकार मारले.
गुजरात जाएंट्सच्या संघाने उभारली विक्रमी धावसंख्या
अनुष्का शर्माच्या दमदार खेळीशिवाय सोफी डिवाईनच्या २० चेंडूतील ३८ धावा, कर्णधार अॅश्ली गार्डन हिने ४१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ६५ धावा आणि अखेरच्या षटकात जॉर्जियाने १० चेंडूत तुफानी फटकेबाजीसह केलेल्या २७ धावांच्या जोरावर गुजरात जाएंट्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा करत यूपी वॉरियर्स संघासमोर २०८ धावांचे टार्गेट सेट केले आहे. WPL च्या इतिहासात गुजरातच्या संघाची ही सर्वोच्च धावसंख्याही ठरली.