ब्रिस्बेन : चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत भारताच्या अनुभवहीन गोलंदाजांनी फारच प्रभावी मारा केला. विशेषत: युवा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर याने लक्षवेधी कामगिरी केली असून, त्याने रवीचंद्न अश्विनची उणीव जाणवू दिली नसल्याची प्रशंसा ऑस्ट्रेलियाचे सहायक कोच ॲन्ड्रयू मॅक्डोनल्ड यांनी केली आहे.
मालिकेत अनेक खेळाडू जखमी झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ८९ धावांत तीन तसेच मध्यम जलद गोलंदाज टी. नटराजन याने ७८ धावांत तीन गडी बाद केले. हे दोघेही नेट गोलंदाज म्हणून दौऱ्यावर आले होते. दुसऱ्यादिवशी खेळ संपल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मॅक्डोनल्ड म्हणाले,‘भारतीय गोलंदाजांनी फारच सातत्यपूर्ण मारा केला. वॉशिंग्टन सुंदर मला फार शिस्तबद्ध वाटला. त्याने अश्विनची भूमिका चोखपणे बजावली. टिच्चून मारा करताना त्याने तीन फलंदाज देखील बाद केले.
आयपीएलमध्ये कोचिंग देणारे मॅक्डोनल्ड हे नटराजनच्या गोलंदाजीमुळेही प्रभावित आहेत. नटराजनने आमच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले असून, तो अनुभवहीन वाटला नाही. प्रथमश्रेणीचा त्याचा अनुभव फार मोठा आहे. अनुभवाच्या आधारे त्याने शानदार कामगिरी केली, असे माझे मत आहे.
‘भारतीय गोलंदाजांनी आजच्या खेळात पूर्णवेळ दडपण राखून आमच्या फलंदजांना फारशी मोकळीक दिली नाही. मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद झाल्याचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते,’ असे ३९ वर्षांचे मॅक्डोनल्ड यांनी म्हटले आहे.