मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवताना सातव्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. अंतिम लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर तीन विकेट राखून विजय मिळवला. हा सामना चुरशीचा झाला आणि अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेत केदार जाधवने भारताला जेतेपद जिंकून दिले. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा पराभव पचनी पडलेला नाही. बांगलादेशच्या एका चाहत्याने तर चक्क विराट कोहलीची वेबसाईट हॅक करून ICC ला टार्गेट केले.
जेतेपदाच्या सामन्यात लिटन दासने ११७ चेंडूत १२१ धावांची खेळी साकारली. त्याला महेंद्रसिंग धोनीने यष्टिचीत करून माघारी जाण्यास भाग पाडले. तिसऱ्या पंचाने त्याला बाद ठरवले. मात्र बांगलादेशच्या चाहत्यांना हा निर्णय काही पटला नाही. तो निर्णय हेतुपुरस्सर भारताच्या बाजूने दिल्याचा दावा या चाहत्यांनी केला. याचा विरोध म्हणून बांगलादेशच्या चाहत्याने चक्क विराट कोहलीची वेबसाईट हॅक केली आणि आयसीसीला लिटनला बाद ठरवणाऱ्या निर्णयाचा जाब विचारला.
त्याने विराटच्या वेबसाईटवर लिहिले की," क्रिकेट हा जंटलमन गेम राहिला आहे का? प्रत्येक संघाला समान न्याय दिला जात आहे का? लिटनला बाद कसे ठरवले याचे उत्तर द्या? त्या चुकीच्या निर्णयाची माफी मागत नाही आणि त्या पंचावर कारवाई करत नाही, तोपर्यंत आणखी वेबसाईट हॅक होत राहतील."
![]()