२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघातून स्टार फलंदाज शुभमन गिलला वगळल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. याच मुद्द्यावरून आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पत्रकारांनी घेरले, मात्र त्यांनी यावर बोलणे टाळले आहे.
भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दिल्ली विमानतळावर दाखल झाले. शुभमन गिलसारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूला विश्वचषकातून का डच्चू दिला? हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी गंभीर यांना प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीर यांनी यावेळी मौन पाळणे पसंत केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, पत्रकार गंभीर यांच्या मागे धावत आहेत. परंतु, गंभीर एकही शब्द न बोलता वेगाने पुढे चालत गेले आणि थेट आपल्या कारमध्ये बसून घरी रवाना झाले.
शुभमन गिलला डावलून अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांसारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. गिलला वगळल्यामुळे सोशल मीडियावर चाहते संताप व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटूंनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले असून, गंभीर यांच्या मौनामुळे या वादाला अधिक तोंड फुटले आहे.
२०२६ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन (यष्टीरक्षक).