भारताच्या युवा संघानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना युवा संघानं 298 धावांचं लक्ष्य उभं केलं. यशस्वी जैस्वाल, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं मोठा पल्ला गाठला. सिद्धेश वीरनं तुफान फटकेबाजी केली.
19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात टीम इंडियानं उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईकर यशस्वी जैस्वालनं अर्धशतकी खेळी करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. यशस्वीनं 74 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या. यशस्वी आणि दिव्यांश सक्सेना यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. दिव्यांश 27 चेंडूंत 3 चौकार लगावताना 23 धावांवर माघारी परतला.
त्यानंतर कर्णधार प्रियंक गर्ग आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेसाठी अर्धशतकी भागीदारी केली. तिलक वर्मा 53 चेंडूंत 3 चौकार लगावताना 46 धावांवर माघारी परतला. गर्गनेही अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाच्या धावसंख्येत हातभार लावला. 72 चेंडूंत 56 धावा करून गर्ग बाद झाला. ध्रुव जुरेल आणि सिद्धेश वीर यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचार करून दिली. ध्रुवनं अर्धशतक झळकावलं. सिद्धेशनं 27 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 44 धावा चोपल्या. ध्रुवही 48 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार लगावत 52 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियानं 4 बाद 297 धावा केल्या.