दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमधील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये निराशा दिसत होती. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी मात करत मिळवलेल्या विजयानंतर, भारतीय संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्णधार केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची शानदार फलंदाजी आणि कुलदीप यादव तसेच हर्षित राणा यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या दोरावर हा विजय साकार झाला.
या विजयानंतर हॉटेलमध्ये संघातील खेळाडूंनी जबदस्त जल्लोष केला. मात्र, या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून, ड्रेसिंग रूममधील वातावरण तणावपूर्ण असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
जल्लोषापासून कोहली दूरच -
संबंधित व्हिडिओमध्ये, सामन्यानंतर हॉटेलमध्ये कर्णधार केएल राहुल केक कापत असताना सर्व खेळाडू दिसत आहेत. याच वेळी 'प्लेअर ऑफ द मॅच' विराट कोहली लॉबीतून जाताना दिसत आहे. तो राहुलला केक कापताना बघतो, मात्र थांबत नाही अथवा जल्लोषात सहभागी होत नाही. त्याला वारंवार 'विराट सर, विराट सर', म्हणून बोलावले जाते. मात्र तो न थांबता सरळ एलिवेटरच्या दिशेने निगून जातो. कोहली स्वतःमध्येच मग्न असल्याचे दिसत होते.
गंभीर-रोहित यांच्यात 'गंभीर' चर्चा -
दरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा लॉबी परिसरात गहन चर्चा करताना दिसत आहेत. यापूर्वी ड्रेसिंग रूममध्येही ते फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्यासह बोलताना दिसले.
कोहलीनं गंभीरला टाळलं? -
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका क्लिपमध्ये, विजयानंतर विराट कोहली जिन्यातून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना दिसत आहे. गंभीर काचेच्या पलीकडे उभे होते. मात्र, कोहली त्यांच्या जवळ जाताच मोबाईल फोनमध्ये व्यस्त झाला आणि त्याने गंभीर यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
या सर्व व्हायरल क्लिप्समुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये 'ऑल इज वेल' आहे की नाही? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित होत आहे.