भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने पत्नीसोबत मंगळवारी वैकुंठ एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तिरुपती येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सूर्यकुमार यादव आपली पत्नी देविशा शेट्टी हिच्यासोबत मंदिरात पोहोचला होता. यावेळी दोघांनीही पारंपारिक पेहराव केला होता. सूर्यकुमारने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर देविशा पारंपारिक रेशमी साडीत दिसली. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्री या जोडप्याने मनोभावे प्रार्थना केली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर सूर्यकुमार कुटुबियांसोबत वेळ घालवत आहे. श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या परिसरात त्याला पाहताच चाहत्यांनी मोठी गर्दी केली. परंतु, सूर्याने चाहत्यांना नाराज न करता त्यांच्यासोबत सेल्फी काढले.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३-१ असा दिमाखदार विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मैदानावर पुनरागमन करणार आहे. विजय हजारे ट्रॉफीत तो आपल्या मुंबई संघासाठी काही सामने खेळणार आहे. त्यानंतर तो थेट भारतीय संघाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होईल. ७ फेब्रुवारीपासून मायदेशात होणाऱ्या विश्वचषकासाठी सूर्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.