sourav ganguly reveals how he become an opening batsman with sachin tendulkar | सचिन-गांगुलीची ओपनिंग जोडी कशी बनली?, माजी कर्णधारानं सांगितलं गुपित

सचिन-गांगुलीची ओपनिंग जोडी कशी बनली?, माजी कर्णधारानं सांगितलं गुपित

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा सर्वात यशस्वी सलामी जोडीचा उल्लेख केला जातो तेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (sourav ganguly) या जोडीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. भारतीय संघाच्या या दोन माजी धुरंदरांनी भारतासाठी अनेक अविस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, सचिन आणि गांगुली हे दोघंही खरंतर भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखले जात नव्हते. दोघांचाही सलामीवीर जोडी म्हणून नेमका विचार केव्हा आणि कसा केला गेला? याचं गुपित स्वत: माजी कर्णधार सौरव गांगुलीनं सांगितलं आहे. 

गांगुलीनं १९९६ साली इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि खणखणीत शतक साजरं केलं होतं. एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर फलंदाजी म्हणून खेळण्याआधी गांगुली १० सामने मधल्या फळीत खेळून झाला होता. १९९६ साली टायटन कप स्पर्धेत सचिन आणि गांगुली पहिल्यांदाच भारतीय संघासाठी सलामीसाठी उतरले. 

सचिनच्या सल्ल्यानं सलामीला उतरला गांगुली
गांगुलीनं 'रिपब्लिक ऑफ बांगला'ला नुकतीच एक मुलाखत दिली. यात गांगुलीनं सचिनसोबतच्या सलामीचं रहस्य सांगितलं. सचिननंच ओपनिंग कर असं सांगितल्याचं गांगुली म्हणाला. "एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामी करण्याआधी मी मधल्या फळीत खेळायचो. पण एकदा सचिन माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की कसोटीमध्ये तू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोस, आपल्याकडे आता सलामीसाठी फलंदाज नाहीय. मग तू ओपनिंग कर. सचिननं असं सांगताच मी लगेच हो म्हटलं आणि त्या दिवसापासून मी सलामीवीर झालो", असं गांगुलीनं सांगितलं. 

सचिन-सौरवनं एकत्र केलेत ६ हजार धावा
दक्षिण आफ्रिकेविरोधात सचिन आणि गांगुली यांनी पहिल्यांदा सलामीसाठी फलंदाजी केली. या सामन्यात दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारली आणि १२६ धावांची भागीदारी रचली. भारतानं हा सामना गमावला होता. पण संघाला नवी सलामीची जोडी मिळाली होती. सचिन आणि गांगुलीनं भारतीय संघासाठी १३६ वेळा सलामीला फलंदाजी केली आहे. यात दोघांनी मिळून ४९.३२ च्या सरासरीनं ६,६०९ धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून एकूण २१ शतकं आणि २३ अर्धशतकीय भागीदारी रचली आहे. सचिननंही आपल्या करिअरची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाजापासून केली होती. त्यानंतर तोही सलामीवीर म्हणून खेळू लागला होता. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sourav ganguly reveals how he become an opening batsman with sachin tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.