- अयाझ मेमन
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
न्यूझीलंडमध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात श्रेयस अय्यरचे अप्रतिम अर्धशतक शानदार ठरले. या दमदार कामगिरीसह त्याने आपण भारताचा भविष्यातील मोठा फलंदाज असल्याचे संकेत आहे. मधल्या षटकांमध्ये लोकेश राहूल, विराट कोहली आणि शिवम दुबे बाद झाल्यानंतर अय्यर फलंदाजीसाठी आला. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला होता. राहूल आणि कोहली यांच्यातील मोठी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर सामना काहीसा न्यूझीलंडच्या बाजुने वळला होता.
ईडन पार्कच्या सपाट खेळपट्टीवर २०४ धावांचे लक्ष्य फारसे कठीण नव्हते. मात्र राहुल बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी कोसळायला सुरूवात झाली. आघाडीचे फलंदाज आणि कर्णधार बाद झाले होते आणि यामुळे भारतीय संघ काहीसा दबावातही आला होता. मात्र, अय्यरने यावेळी आपली गुणवत्ता दाखवली. त्याने शानदार फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजुने मनिष पांडे शांतपणे खेळी करत होता. अय्यरने टिम साऊदीसह न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले. त्यामुळे एक षटक शिल्लक राखूनच भारताने विजय मिळवला. यावरुनच त्याने राखलेले वर्चस्व दिसून येत होते.
अय्यरसोबतच भारताच्या इतर फलंदाजांनीही संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करताना राहुल आणि कोहली यांनी डाव सांभाळला. यामध्ये माझ्यामते राहुलचे नाव आघाडीवर घ्यावे लागेल. तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील मोठ्या आणि महत्त्वाच्या काळातून जात आहे. या सामन्यासाठी रिषभ पंतची निवड झाली नाही. त्यामुळे आता राहुल हाच पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. संघ व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून बघायचे झाले, तर त्यामुळे भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीतील एक मोठा पर्याय मिळतो. जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज का आहे हे त्याने सिद्ध केले. मात्र तोही येथे फसला होता. चहल व जाडेजा यांनी या खेळपट्टीवर प्रभाव टाकला. इतर गोलंदाजांवर टीका केली जाऊ शकत नाही. कारण खेळपट्टीतून त्यांना नक्कीच मदत मिळत नव्हती. त्याचवेळी, भारतासाठी चिंतेचा विषय म्हणजे ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे आहे. कारण त्यामुळेच न्यूझीलंडने २०० पेक्षा जास्त धावा केल्या.