भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी तिच्या बहिण वत्सला हिचं निधन झालं, दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच तिच्या आईचंही निधन झालं होतं. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु मागील आठवड्यात वेदाच्या आईचं आणि आज बहिणीचं निधन झालं.
२४ एप्रिलला केलं होतं ट्विट
वेदा कृष्णमूर्तीच्या (Veda Krishnamurthy) आई चेलुवम्बदा देवी यांचं २४ एप्रिलला कोरोनामुळे निधन झालं. स्वत: वेदानं याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून माझ्या बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे, असेही तिनं आपल्या ट्विटमधून सांगितले होते.
"आम्माच्या निधनानंतर तुम्ही केलेल्या सांत्वनाबद्दल मी आभारी आहे. आई शिवाय माझ्या कुटुंबाचा विचारही केला जाऊ शकत नाही, हे तुम्ही समजू शकता. तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा सन्मान कराल हीच अपेक्षा आहे. या परिस्थितीमधून जाणाऱ्या सर्वांबद्दल मला संवेदना आहेत.", असे ट्विट वेदानं केलं होतं. दरम्यान, वेदानं भारतीय महिला क्रिकेटसाठी 47 वन-डे आणि 76 टी20 सामने खेळले आहेत.