मुंबई - टी-20 मालिका आटोपल्यावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले आहे. आता धवनच्या अनुपस्थितीत युवा सलामीवीर मयांक अग्रवाल याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
![]()
सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान शिखर धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर धवनच्या माघारीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसनचा संघात समावेस करण्यात आला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी धवन तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या दुखापतीचे स्वरूप अपेक्षेहून गंभीर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे धवनला एकदिवसीय मालिकेतूनही माघार घ्यावी लागली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीचा भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार