selling milk from a bicycle a man made his child as cricketer; now be India's captain in the World Cup | मुलानं नाव काढलं! सायकलवरून दूध विकून मुलाला बनवले क्रिकेटर; आता विश्वचषकात भारताचे भूषवणार कर्णधारपद

मुलानं नाव काढलं! सायकलवरून दूध विकून मुलाला बनवले क्रिकेटर; आता विश्वचषकात भारताचे भूषवणार कर्णधारपद

मुंबई : परिस्थिती तशी बेताचीच होती. घर चालवण्याठी वडिल सायकलवरून दूध विकत फिरायचे. पण मुलाला वेड होते ते क्रिकेटपटू बनायचे. या मिळकतीमध्ये मुलाला क्रिकेटपटू कसं बनवायचं, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता. कारण जिथे दोन वेळचे जेवण कसेबसे मिळत होते, त्यामुळे क्रिकेटचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. पण मुलामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली होती. आता काय करायचं, त्यांना काही कळत नव्हतं. पण जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच मिळतो, असं म्हणतात. तो मार्ग अखेर त्यांना सापडला आणि त्यांचा मुलगा आता भारताचे थेट विश्वचषकात नेतृत्व करणार असल्याचे जाहीर झाले आहे.

मेरठमध्ये किला परीक्षितगढ येथे ते राहायचे. आठ वर्षांचा असल्यापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी शाळेमध्ये तो दमदार क्रिकेट खेळायचा. त्याचा खेळ पाहून त्याला मेरठमधील क्रिकेट अकादमीमध्ये पाठवावे, असे त्याच्या बाबांना बऱ्याच जणांनी सांगितले होते. पण अकादमीचे शुल्क त्यांना परवडणारे नव्हते.

बऱ्याच लोकांनी वडिल नरेश यांच्या मागे पाठपुरवठा केला आणि त्यांच्या मुलाला प्रशिक्षक संजय रस्तोगी यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी रस्तोही सरांनी त्यांचा खेळ पाहिला आणि त्यांनी आपण याला शिकवणार असल्याचे जाहीर केले. पण तरीहीदेखील हा खर्च आपल्याला झेपणार नाही, हे त्याच्या आई-वडिलांना वाटत होते.

क्रिकेट सोडून आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि सरकारी अधिकारी व्हावे, असे त्याच्या आई-वडिलांना वाटत होते. काही वेळा आई-वडिलांनी त्याला क्रिकेट सोडायचा सल्ला दिला होता, पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर २०११ साली त्याच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीतून तो सावरला आणि भारताकडून वयोगटातील स्पर्धामध्ये सहभागी होत राहीला.

सातत्यपूर्ण नेत्रदीपक कामगिरी करत या खेळाडूने थेट भारताचे कर्णधारपद पटकावले. तो आता १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. हा खेळाडू आहे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियांक गर्ग.

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पुरुष व महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्यानं क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. पण, तत्पूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्यासाठी बीसीसआयनं सोमवारी आपला संघ जाहीर केला. 19 वर्षांखालील या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या या संघात मुंबईच्या तीन खेळाडूची निवड करण्यात आली आहे. 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.  भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळीही टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 

या संघात अथर्व अंकोलेकर, दिव्यांश सक्सेना व यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. डावखुरा फिरकीपटू असलेल्या अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टमध्ये कंडक्टर होते. २०१० साली अथर्वच्या वडिलांचे निधन झाले, पण अथर्वने हार मानली नाही आणि आता त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले आहे. वडिलांच्या निधनानंतर अथर्वला क्रिकेटसाठी आई वैदही अंकोलेकर यांनी प्रोत्साहन दिले. वैदही सध्या मरोळ बेस्ट आगारामध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावून देण्यात अथर्वचा मोठा वाटा आहे.  
भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताचा डाव 106 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेश सहज विजय मिळवून आशिया चषक नावावर करेल असा अंदाज होता.  बांगलादेशने जिद्द सोडली नाही आणि अखेरपर्यंत खिंड लढवली. मात्र, अवघ्या 5 धावांनी त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली. या सामन्यात मुंबईकर अथर्वने 28 धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.  

'तो' तंबूत राहिला, पाणीपुरी विकली अन् आता डबल सेन्च्युरी ठोकली; 'यशस्वी' प्रवासाची गोष्ट

या संघात स्थान पटकावणारा यशस्वी हा दुसरा मुंबईकर खेळाडू आहेत. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत त्यानं विक्रमी खेळी केली होती. मुंबई विरुद्ध झारखंड या सामन्यात यशस्वीनं डबल सेन्चुरी झळकावली. यशस्वीचं वय केवळ 17 वर्ष 292 दिवस... लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात युवा फलंदाज ठरला होता. या द्विशतकासह त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग, शिखर धवन यांच्या पक्तिंत स्थान पटकावलं होतं. 
मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्यानं झारखंड संघाविरुद्ध 154 चेंडूंत 203 धावा चोपल्या. लिस्ट A क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूनं झळकावलेलं हे नववं द्विशतक आहे, तर सातवा फलंदाज आहे. विशेष म्हणजे यशस्वी केवळ 17 वर्ष 292 दिवसांचा आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.

भारतीय संघ - प्रियांक गर्ग ( कर्णधार),  ध्रुवचंद जुरेल ( उपकर्णधार-यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभंग  हेगडे, रवी विश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशग्रा ( यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: selling milk from a bicycle a man made his child as cricketer; now be India's captain in the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.