मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख, भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते सलिल अंकोला (salil ankola) यांना कोरोनाची लागण झाली आहे. सलिल अंकोला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. दुर्दैवाची बाब अशी की अंकोला यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच कोरोनाचा अहवाल हाती आला आणि ते पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या वाढदिवशी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलीय. (salil ankola tests corona positive)
"माझा उद्या वाढदिवस आहे आणि मला कोरोना झालाय. हा वाढदिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरेल. कोरोनाची लागण झाल्यानं मला भीती वाटतेय. मी लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना करा. मी लवकरच बरा होऊन परतेन", अशी भावूक पोस्ट सलील अंकोला यांनी लिहिलीय.
सचिनसोबत केलं होतं कसोटी पदार्पण
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलील अंकोला यांना सचिन तेंडुलकरसोबत पदार्पण केलं होतं. दुर्दैव असं की अंकोला यांच्यासाठी हा सामना कसोटी कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना ठरला. त्यानंतर अंकोला यांना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. अंकोला यांनी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना १३ फेब्रुवारी १९९७ रोजी खेळला होता.
'बोन ट्यूमर'चं संकट
सलील अंकोला यांना हाडाचा कॅन्सर (बोन ट्यूमर) झाल्यानं त्यांना हळूहळू क्रिकेटपासून दूर व्हावं लागलं. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अंकोला यांना क्रिकेटला रामराम करावं लागलं. त्यानंतर अंकोला यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवलं व ते यशस्वी देखील झाले. "विकराल गबराल", "शूssss कोई है" या गाजलेल्या मालिकांमध्ये अंकोला यांनी काम केलं आहे. यानंतर सलील अंकोला बिग बॉस या रिआलिटी शोमध्येही दाखल झाले होते. सध्या २०२० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. अंकोला सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे प्रमुख आहेत.