Rohit Sharma airport viral video: भारतीय संघ ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरूद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. या क्रिकेट मालिकेची सुरुवात वनडे सामन्यांनी होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली या दोन दिग्गजांसह भारतीय संघ ११ तारखेला पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा, दुसरा सामना राजकोट तर तिसरा सामना इंदोरला खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्याआधी रोहित शर्मा मुंबई विमानतळावर आला होता. यावेळी रोहित शर्मासोबत घडलेल्या एका घटनेमुळे तो चर्चेत आला आहे. रोहित शर्मा या व्हिडीओमध्ये लहान मुलीच्या पालकांना ओरडताना दिसला. विशेष म्हणजे, रोहितने पालकांवर नाराजी व्यक्त केल्यावर नेटकऱ्यांनी रोहितचे कौतुक केले.
नेमके काय घडले?
रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वडोदराला रवाना होणार होता. त्यासाठी तो आपल्या घरून मुंबई विमानतळावर आला. रोहित शर्मा कारमधून बाहेर पडून विमानतळाच्या आत जात असल्याचे दिसताच चाहत्यांनी त्याच्याभोवती सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. त्याचदरम्यान, एका व्यक्तीने आपल्या लहान मुलीला त्या चाहत्यांच्या घोळक्यात पुढे एकटेच सोडून दिले. गर्दीमुळे त्या मुलीला दुखापत होण्याची शक्यता होती. हा प्रकार पाहून रोहित शर्मा संतापला. असं वागणं बरं नाही, अशा प्रकारचे हावभाव रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले. तुम्ही लोकं हे खूप चुकीचं वागता... अशा शब्दात रोहितने त्या चिमुरडीच्या पालकांना चांगलंच सुनावलं.
रोहितच्या वागण्याचे चाहत्यांकडून कौतुक
रोहित शर्मा त्या चिमुरडीला पाहताच थांबला आणि त्याने तिच्या पालकांना बोलवून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला पालकांच्या हवाली केले आणि मगच तो पुढे गेला. हा सारा प्रकार अवघ्या काही सेकंदाचा होता. पण इतक्या घाईगडबडीतही रोहितने संयम दाखवला आणि शांतपणे पालकांना सुनावून तो पुढे निघून गेला. त्याच्या याच स्वभावामुळे चाहत्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, अशाप्रकारे लहान मुलांना पुढे करून सेलिब्रिटींच्या जवळ जाणाऱ्या पालकांवर चाहत्यांनीही सोशल मीडियावर टीका केली.