Rohit Sharma-Virat Kohli: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून अचानक घेतलेल्या निवृत्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उथप्पाच्या मते, हा निर्णय अजिबात स्वाभाविक वाटत नाही. यामागे काहीतरी मजबुरी असण्याची शक्यता आहे.
‘रो-को’ आता फक्त वनडे क्रिकेटपुरतेच मर्यादित
रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मे महिन्यात त्यांनी कसोटी क्रिकेटलाही अचानक अलविदा केल्याने संपूर्ण क्रिकेटविश्व चकित झाले.
निवृत्ती मागे ‘काहीतरी वेगळे’
आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये रॉबिन उथप्पाने स्पष्टपणे सांगितले की, रोहित आणि विराट यांची कसोटी निवृत्ती नैसर्गिक वाटत नाही. मला माहीत नाही की, ही निवृत्ती जबरदस्तीने घेतलेली होती का, पण ही अजिबात नैसर्गिक नाही. यामागची खरी कारणे ते दोघेच त्यांच्या वेळेनुसार सांगतील.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रणजीत पुनरागमन
ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी बराच काळानंतर रणजी ट्रॉफीत पुनरागमन केले होते. या पुनरागमनामागे कसोटी कारकीर्द पुढे नेण्याचा त्यांचा स्पष्ट उद्देश असल्याचे मानले जात होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. याच काळात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिल याची नवी कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अचानक कसोटी निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. उथप्पासारख्या माजी खेळाडूंच्या वक्तव्यामुळे या निर्णयामागील खरे कारण काय, याबाबत चर्चांना अधिकच उधाण आले आहे. आता या प्रश्नांची उत्तरे रोहित आणि विराट स्वतः कधी देतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.