दुबई: आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघानं २०६ धावांची मजल मारून आरसीबीसमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलं आहे. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं बंगलोरच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करत १३२ धावा चोपून काढल्या. राहुल शतकाच्या जवळ असताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनं लागोपाठ दोनदा झेल सोडले. त्यानंतर राहुलनं टॉप गियर टाकला आणि संघाला दोनशेचा पल्ला गाठून दिला.
राहुलनं शानदार शतक साकारत आज अनेक विक्रम मोडीत काढले. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम राहुलच्या नावावर जमा झाला आहे. हा विक्रम आधी डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरनं २०१७ मध्ये हैदराबादचं नेतृत्त्व करताना १२६ धावांची खेळी साकारली होती. २०११ मध्ये विरेंद्र सेहवागनं दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना ११९ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये आरसीबीचं कर्णधारपद भूषवताना विराट कोहलीनं तीन शतकं (११९ धावा, १०९ धावा, १०८ धावा नाबाद) झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही आता राहुलकडे आहे. रिषभ पंतनं २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२८ धावांची खेळी केली होती. पंतचा विक्रम आज राहुलनं मोडीत काढला. पंतनंतर मुरली विजय (चेन्नईकडून खेळताना १२७ धावा), विरेंद्र सेहवाग (पंजाबकडून खेळताना १२२ धावा), पॉल वेल्थॅटी (पंजाबकडून खेळताना नाबाद १२० धावा) यांचा क्रमांक लागतो.
कर्णधार असताना आणि कर्णधार नसताना शतक साकारणारा चौथा खेळाडू
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळत असताना आणि कर्णधार म्हणून खेळत नसताना शतक झळकावण्याची किमया आतापर्यंत केवळ दोन खेळाडूंना जमली होती. विरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर यांनाच ही कामगिरी जमली आहे. आता राहुलच्या नावावरही ही कामगिरी जमा झाली आहे.