ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका महिला संघात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऐतिहासिक खेळीची नोंद झाली. ऑस्ट्रेलियानं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 282 धावा चोपून काढल्या. या सामन्यात रायचेल हायनेस ( 118), एलिसा हिली ( 69) आणि कर्णधार मेग लॅनिंग ( 45) यांनी दमदार खेळी केली. हायनेसने प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि सर्वात अधिक वयात शतक झळकावणाऱ्या फलंदाजामध्ये तिनं दुसरे स्थान पटकावले.
हिली आणि हायनेस यांनी पहिल्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. हिली 62 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा करून माघारी परतली. त्यानंतर हायनेस व लॅनिंग या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदीर करताना संघाला दोनशे धावांचा पल्ला ओलांडून दिला. लॅनिंग 62 चेंडूंत 45 धावा ( 3 चौकार) करून माघारी परतली. पण, हायनेसने एका बाजूनं फटकेबाजी करताना शतक पूर्ण केले. श्रीलंकेच्या अचिनी कुलसुरीयानं 3, तर सुगंदीका कुमारी आणि शशीकला सिरीवर्धने यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
हायनसने 132 चेंडूंत 8 चौकार ठोकताना 118 धावा केल्या. 55 आंतरराष्ट्रीय वन डे सामना नावावर असलेल्या हायनसचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक ठरले. सर्वात अधिक वयात पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारी तिसरी वयस्कर ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू ठरली आहे.
32 वर्ष 124 दिवस - रुथ बकस्टेन 100 वि. नेदरलँड्स, 1988 ( वन डे)
33 वर्ष 93 दिवस - शेली नित्सचके 113* वि. न्यूझीलंड, 2010 ( वन डे)
32 वर्ष 285 दिवस - राचेल हायनेस 118 वि.
श्रीलंका, 2019 ( वन डे)