दुबई : आयसीसीने क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी दिशानिर्देश जाहीर केले. यात स्थानिक क्रिकेटपटूंपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा सराव, खेळ, प्रवास व व्हायरसपासून बचावासाठी सर्व दिशानिर्देशांचा समावेश आहे. या दिशानिर्देशांनुसार कुठल्याही स्पर्धेपूर्वी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्याच्या १४ दिवसांपूर्वी संघाला आयसोलेशनमध्ये सराव शिबिर आयोजित करावे लागेल. या व्यतिरिक्त चेंडूला लकाकी आणण्यासाठी थुंकीचा वापर करण्यास बंदी असेल. या व्यतिरिक्त खेळाडूंच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल. आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीने अनेक जाणकारांच्या साथीने दिशानिर्देश निश्चित करण्यात आले.
सरावाचा सल्ला
आयसीसीने चार वेगवेगळ्या टप्प्यात सराव सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या टप्प्यात खेळाडूंना वैयक्तिक सरावाची सूट देण्यात आली आहे तर दुसºया टप्प्यात तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू एकत्र सराव करू शकतील. दरम्यान, यावेळीही फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल.
अखेरच्या टप्प्यात संघाच्या सरावाला मंजुरी
तिसºया टप्प्यात १० पेक्षा कमी खेळाडू एकत्र सराव करू शकतील तर चौथ्या व अखेरच्या टप्प्यात पूर्ण संघाला एकत्र सराव करता येईल. दरम्यान, यावेळी १० किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडूंना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी राहील. त्यांना गोलंदाजीसह फलंदाजीचाही सराव करता येईल.
आता पंचाना कॅप देता येणार नाही त्यात म्हटले आहे की, खेळाडूंनी कॅप, टॉवेल, जम्पर्स आदी षटकादरम्यान पंचाकडे द्यायला नको. या व्यतिरिक्त अम्पायर्सला चेंडू आपल्या जवळ ठेवताना ग्लोव्ह्जचा वापर करावा लागू शकतो.
दीड मीटरचे अंतर राखावे लागेल
आयसीसीने खेळाडूंदरम्यान नेहमी दीड मीटर ( किंवा संबंधित सरकारने निश्चित केलेले अंतर) राखणे आणि वैयक्तिक क्रीडा साहित्याची सातत्याने स्वच्छता करण्याची शिफारस केली आहे. आयसीसीने सराव व स्पर्धेदरम्यान योग्य दर्जाची चाचणी योजना तयार करण्याची शिफारस केली आहे.
महत्त्वाच्या बाबी
सरावापूर्वी व सरावानंतर साहित्य सॅनिटाईझ करणे आवश्यक
चेंडूला लकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरास बंदी
पंचांना चेंडू हाताळताना ग्लोव्ह्ज घालण्याचा सल्ला
चेंडूच्या वापरादरम्यान हात वारंवार सॅनिटाईझ करणे
खेळाडूंनी एकमेकांच्या साहित्याचा वापर टाळावा
खेळाडूंना घरूनच तयार होऊन यावे लागेल
खेळाडूंनी जल्लोष करताना संपर्कात येण्याचे टाळावे
एकमेकांच्या पाण्याची बॉटल, टॉवेलच्या वापरावर बंदी
स्थानिक पातळीवर आजार पसरण्याचा धोका नसावा