सध्या अजिंक्य रहाणे खराब फॉर्मचा सामना करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला चांगली कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान, आता त्याचं संघात पुनरागमन होणं कठीण असल्याचं मत माजी जलदगती गोलंदाज झहीर खान यानं व्यक्त केलं.
न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आलेली नाही. तसंच यामागे दुखापतीचं कारण असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं. दरम्यान, आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवणं थोडं कठीण असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येतंय.
सध्या अजिंक्य रहाणे खराब फॉर्मचा सामना करत आहे. २०२१ मध्ये रहाणेनं १२ कसोटी सामन्यांमध्ये २०.३५ च्या सरासरीनं केवळ ४०७ धावा केल्या होत्या. तर गेल्या वर्षी त्यानं चार सामन्यांमध्ये ३८.८६ च्या सरासरीनं २७२ धावा केल्या होत्या.
अजिंक्य रहाणे हा लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. परंतु आता देशात एकापेक्षा एक चांगले तरुण खेळाडू आहेत. ते आता टीम इंडियामध्ये सहभागासाठीही तयार आहेत, असं झहीर खान क्रिकबझशी बोलताना म्हणाला.
'जर तुम्ही अनफिट असाल तर कठीण आहे. परंतु जर तुम्ही टीममधून बाहेर गेलात, तर तुम्हाला पुनरागमनाची संधी मिळणार नाही असं होत नाही. परंतु आताच्या भारतीय संघात सतत संधी मिळणं कठीण आहे,' असंही तो म्हणाला.
'सध्या तरुण खेळाडू अतिशय मजबूतीनं आपण संघातील दावेदार आहोत हे दाखवून देत आहे. अशा परिस्थितीत जे सध्या प्लेइंग इलेव्हेनचे सदस्य आहेत, त्यांना सातत्यानं आपली कामगिरी सिद्ध करावी लागेल,' असंही झहीरनं स्पष्ट केलं.
भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला विश्रांती दिली गेली. बीसीसीआयनं तो दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले, परंतु तोच अजिंक्य ड्रिंक्स ब्रेक्समध्ये भारतीय फलंदाजांसाठी पाणी घेऊन आलेला दिसला. त्यामुळे त्याच्या दुखापतीवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यात आता अजिंक्यकडून उप कर्णधारपदही जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
अजिंक्य मागील बऱ्याच काळापासून फॉर्मशी झगडताना दिसत आहे. त्यामुळे बीसीसीआय हा निर्णय घेणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होईल आणि त्यात कसोटी संघाचे उप कर्णधारपद अजिंक्यच्या हातून काढून घेतलं जाईल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी येत्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यांना आता केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ ९ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार होता, परंतु आता मालिकेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. सरकारनं या दौऱ्याला परवानगी दिल्यास या दौऱ्याची सुरुवात १७ डिसेंबरऐवजी २६ डिसेंबरला होईल. म्हणजे दौरा ९-१० दिवस उशिरानं सुरू होईल.