युवराज सिंगचा सिक्सर किंग अवतार आज क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीत युवराज सिंगने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन करताना षटकारांची बरसात केली.
या सामन्यात २० चेंडूत नाबाद ४९ धावा कुटणाऱ्या युवराज सिंगने महेंद्र नागामुटूने टाकलेल्या डावातील १९ व्या षटकात चार षटकार ठोकले. त्याने षटकातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. या खेळीदरम्यान युवीने सात चेंडूत पाच वेळा चेंडूला सीमारेषेपार भिरकावले.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यातही युवीने सलग ४ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. त्या सामन्यात झेंडर डिब्रुयनच्या एका षटकात युवराजने सलग चार षटकार ठोकले होतेय
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने सचिन तेंडूलकरची अर्धशतकी खेळी (६५ धावा), युसूफ पठाणच्या (नाबाद २७ धावा) युवराजच्या (नाबाद ४९ धावा) आणि सेहवागच्या (३५ धावा) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २१८ धावा फटकावल्या होत्या.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने तुफानी फटकेबाजी केली. ड्वेन स्मिथ आणि नरसिंग देवनारायणची अर्धशतके आणि ब्रायन लाराच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.
मात्र मनप्रीत गोनी, विनय कुमार आणि इरफान पठाणने शेवटच्या तीन षटकांत टिच्चून मारा करत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघ रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.