WTC Final : भारताच्या मार्गात पाकिस्तान आडवा; कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलच्या शर्यतीत रोहित शिकवणार धडा

WTC Final scenarios : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता सर्व संघांना वेध लागले आहेत ते कसोटी वर्ल्ड कपचे... जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीची चुरस वाढलेली पाहायला मिळतेय...

WTC Final scenarios : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता सर्व संघांना वेध लागले आहेत ते कसोटी वर्ल्ड कपचे... जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीची चुरस वाढलेली पाहायला मिळतेय... ऑस्ट्रेलिया सध्या आघाडीवर असली तरी दुसऱ्या स्थानासाठी भारताच्या मार्गात पाकिस्तान मोठा अडथळा निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३च्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघ जेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन संघ WTC Standings मध्ये अव्वल दोन क्रमांकावर आहेत. पण, भारतीय संघाला संधी आहे.

ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, भारत, पाकिस्तान यांच्यासह सहा संघ शर्यतीत आहेत. आता सध्या दोन महत्त्वाच्या मालिका होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा पाहुणचार करणार आहे, तर इंग्लंडचा संघ तीन कसोटीच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ७०टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे आणि पॅट कमिन्सचा संघ फायनलसाठी आघाडीवर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला फायनलमधील प्रवेश पक्का करता येणार आहे. पुढे त्यांच्यासमोर टीम इंडियाचे आव्हान असल्याने त्यांना घरच्या मैदानावरील मालिका जिंकणे सोईचे ठरेल. त्यानंतर पुन्हा घरच्या मैदानावर कांगारू दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहेत.

वेस्ट इंडिजचा संघ ५० टक्क्यांसह सहाव्या क्रमांकावर आहे आणि ऑसींना नमवून त्यांची टक्केवारी ६५ पर्यंत जाऊ शकते. पाकिस्तान ५१.८५ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर त्यांची टक्केवारी ६९ इतकी होऊ शकते. ही गोष्टा भारतासाठी धोकादायक ठरू शकते. ३८.६ टक्के असलेल्या इंग्लंडचे फायनलसाठीचे आव्हान संपुष्टात आले आहे.

ऑस्ट्रेलिया सर्वाधिक ७० टक्क्यांसह अव्वल स्थानावर आहे. ६० टक्क्यांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंका आणि भारत अनुक्रमे ५३.३३ व ५२.०८ टक्क्यांसह तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. न्यूझीलंडने WTC चे जेतेपद नावावर केले होते.

भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे , तर फेब्रुवारी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. जून ३०मध्ये जागतिक कसोटी स्पर्धा संपतेय. सध्या भारतीय संघ ५२.०८ टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांना उर्वरित सहा कसोटी जिंकाव्या लागतील, तर भारताची टक्केवारी ६८.०६ इतकी होईल.