Join us  

WTC Final : टीम इंडियाला जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये पोहोचवणारे ६ खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्याला मुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 12:36 PM

Open in App
1 / 7

WTC Final : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या संघांना पराभवाची धुळ चारून टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलमध्ये धडक मारली. १८ ते २२ जून या कालावधीत साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध हा अंतिम सामना होणार आहे. पण, भारताला या अंतिम सामन्यात प्रवेश करून देणारे सहा खेळाडू कदाचित हा ऐतिहासिक सामना खेळू शकतील.

2 / 7

मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) - इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नव्हता. त्यात मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे मोहम्मद सिराजला मेलबर्न कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर सिराजनं जो करिष्मा दाखवला तो कांगारू पाहतच राहिले. सिराजनं त्या मालिकेत १४ विकेट्स घेतल्या होत्या आणि इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्यानं जो रूट व जॉनी बेअरस्टो यांना बाद केलं. पण, आता जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनाचा पहिली पसंती असेल. यापैकी कुणी दुखापतग्रस्त झालाच, तर सिराजला संधी मिळू शकते.

3 / 7

अक्षर पटेल ( Axar Patel) - रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं तीन कसोटीत २७ विकेट्स घेत कमाल केली. डे नाईट कसोटीत ११ विकेट्स घेणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरला. तरीही जागतिक कसोटीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला आहे आणि हार्दिक पांड्याचा पर्यायही संघासमोर आहे.

4 / 7

वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) - अतिरिक्त गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या वॉशिंग्टननं टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शार्दूल ठाकूरसोबत त्यानं लढवलेली खिंड आणि अहमदाबाद कसोटीतील नाबाद ९६ धावांची खेळी कुणीच विसरणार नाही. पण, आर अश्विन, रवींद्र जडेजा यांच्या उपस्थितीत त्याला फायनल खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

5 / 7

टी नटराजन ( T Natarajan) - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला गवसलेला भविष्याचा स्टार गोलंदाज... या दौऱ्यावर नटराजननं वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केलं. एकाच मालिकेत तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. सिराजप्रमाणे त्यालाही फायनल खेळता येणार नाही.

6 / 7

शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) - सुंदर आणि नटराजन यांच्याप्रमाणेच शार्दूल ठाकूरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून गेला होता. पण, खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र कायम राहिले आणि शार्दूलला संधी मिळाली. त्यानं ७ विकेट्स व ६७ धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

7 / 7

हनुमा विहारी ( Hanuma Vihari) - सिडनी कसोटीत दुखापतग्रस्त असूनही हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी जो संयम दाखवला त्यासमोर ऑसी गोलंदाज हतबल झाले. सिडनी कसोटी अनिर्णीत राखून विहारीनं भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत महत्त्वाचे गुण कमावले. पण, तोही फायनलला मुकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद सिराजशार्दुल ठाकूरअक्षर पटेलवॉशिंग्टन सुंदर