आगामी IPL 2025 स्पर्धेसाठी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता सर्व संघांना आणि खेळाडूंना मेगा लिलावाचे वेध लागले आहेत. यंदाचा लिलाव २४, २५ नोव्हेंबरला होणार आहे.
यंदा लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यात पहिल्यांदाच लिलावासाठी थॉमस जॅक ड्राका नावाच्या इटलीतील क्रिकेटरने नावनोंदणी केली असून त्याचे मुंबई इंडियन्सशी खास कनेक्शन आहे.
साहजिकच लिलावात ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, इंग्लंड, विंडिज, न्यूझीलंड सारख्या संघांचे खेळाडू असतात, पण यंदा पहिल्यांदाच इटलीचा खेळाडू लिलावाचा भाग असणार आहे.
काही महिन्यांपूर्वी इटालियन संघात सामील झालेला माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज जो बर्न्स याने साऱ्यांचेच लक्ष वेधले. त्यानंतर आता थॉमस जॅक ड्राका या नावाची चर्चा रंगली असून तो लिलावाचा भाग असेल.
स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, थॉमस हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. २४ वर्षीय गोलंदाजाने यावर्षी इटलीकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ४ टी२० सामन्यामध्ये त्याने ८ गडी घेतले.
थॉमसला फ्रँचायझी क्रिकेटचा अनुभवही आहे. तो कॅनडाच्या ग्लोबल टी20 लीगमध्ये खेळला आहे. या लीगमध्ये ब्रॅम्प्टन वुल्व्ह्सकडून खेळताना त्याने एका हंगामात ६ सामन्यांत ११ बळी घेतले होते.
थॉमस ड्राकाने ऑस्ट्रेलियातील पॉवर पेस क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीवर मेहनत घेतली आहे. त्याच्या गोलंदाजीवर अनेक फ्रँचायजींचे लक्ष आहे.
थॉमस ड्राका हा UAEच्या T20 लीग ILT20 मध्ये मुंबई इंडियन्सच्या MI Emirates मध्ये सामील झाला आहे. या संघाने ILT20 लीगच्या आगामी हंगामासाठी ड्राकाला विकत घेतले आहे.
विदेशी लीगमध्ये ड्राकाला MI Emirates साठी विकत घेतलेले आहे, त्यामुळे Mumbai Indians च्या सांगण्यावरूनच ड्राकाने आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली असल्याची दाट शक्यता आहे.