Devieka Palshikaar: महिलांच्या आयपीएलचा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या पहिल्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचाइजीने तयारी सुरू केली आहे. यात एक मराठमोळा चेहरा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्सने या स्पर्धेसाठी प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. यात इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सकडे मुख्य प्रशिक्षकपद, झुलन गोस्वामीकडे गोलंदाजी प्रशिक्षकपद तर देविका पळशीकरकडे फलंदाजी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.
देविका पळशीकर ही भारताची माजी क्रिकेटपटू आहे. ती मूळची मालवणची असून, तिचा जन्म २० जून १९७९ ला मराठी कुटुंबात झाला.
देविकाने आपल्या कारकिर्दीत उत्तम फलंदाज आणि लेग ब्रेक फिरकी गोलंदाजी केली. देविकाच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर तिला भारतासाठी खेळायची संधी मिळाली. पण तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर २००६ ते २००८ या कालावधीत केवळ एक कसोटी आणि १५ वन डे सामने खेळता आले.
देशांतर्गत क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास, तिने एअर इंडिया आणि महाराष्ट्र या दोन संघांकडून क्रिकेट खेळले. तिच्या दमदार कामगिरीमुळेच तिला भारतीय संघात स्थान मिळाले.
२०१४ आणि २०१६ साली देविका भारताच्या महिला संघाची सहाय्यक प्रशिक्षक होती. २०१८ साली तिने बांगलादेश संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची भूमिकाही सार्थ पार पाडली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने विविध संघांना प्रशिक्षण दिले. तसेच, विमेन्स टी२० चॅलेंज स्पर्धेत ती व्हेलॉसिटी संघाचीही प्रशिक्षक होती.