Aus vs Ind: विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन, म्हणाला- "तो स्वत:च ..."

Rohit Sharma Press Conference on Virat Kohli, Aus vs Ind 4th Test at MCG: गेल्या २ कसोटीतील ४ डावांत विराट कोहलीला केवळ २१ धावा करता आल्या आहेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी २६ डिसेंबर पासून सुरू होत आहे. त्याआधी मेलबर्नमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली.

संघाच्या फलंदाजीच्या क्रमापासून ते संघाच्या नेट प्रॅक्टिस पर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींवर रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आले. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या बाद होण्याच्या पद्धतीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला.

ऑस्ट्रेलियात विराट कोहलीला पहिल्या तीन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने एका सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी केली. ते शतक वगळता उर्वरित पाच सामन्यात त्याला केवळ २६ धावाच करता आल्या.

विराटच्या फॉर्मसोबतच त्याची बाद होण्याची पद्धतही चर्चेत आहे. सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू खेळण्याचा मोह न आवरल्याने तो झेलबाद होताना दिसतोय. या मुद्द्यावरून आज पत्रकारांनी रोहित शर्माला प्रश्न विचारला आणि रोहितने उत्तर दिले.

रोहित म्हणाला, "आधुनिक क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही. विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज आहे. तो ज्या अडचणीत सापडला आहे त्या समस्येतून तो स्वत:चा योग्य मार्ग शोधून काढेल आणि दमदार खेळ करेल."