भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. मात्र यादरम्यान विराट एका वादात अडकला आहे. सोशल मीडियावर विराटने केलेली एक पोस्ट हे या वादाचे कारण ठरले आहे. या पोस्टमधून विराटने एका खासगी विद्यापीठाचा प्रचार केला होता.
विराट कोहलीने बुधवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्ने एका खासगी विद्यापीठाचा प्रचार केला होता. या प्रचारामध्ये त्याने टोकियोमध्ये खेळत असलेल्या ऑलिम्पिकपटूंचा उल्लेख केला होता. त्यानंतर विराटची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली आहे. तसेच नेटिझन्सनी या पोस्टसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, आता विराट कोहलीच्या या जाहिरात असलेल्या पोस्टवर अॅडव्हरटायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ने आक्षेप घेतला आहे. आता लवकरच याबाबत विराट कोहलीला कारणे दाखवा नोटिस बजावली जाऊ शकते.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीने केलेल्या या पोस्टमुळे ASCI च्या नियमांचा भंग झाला आहे. ASCI च्या नियमांनुसार या पोस्टमध्ये ही पोस्ट हे पेड प्रमोशन असल्याचे कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण विराट कोहलीकडून देण्यात आलेले नाही.
विराट कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, काय रेकॉर्ड आहे. भारताचे १० टक्के ऑलिम्पिक खेळाडू हे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधील आहे. मला अपेक्षा आहे की, LPU लवकरच भारतीय क्रिकेट टीममध्येही आपल्या खेळाडूंना पाठवेल. जय हिंद.
विराट कोहलीच्या या पोस्टवर ASCI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या प्रकरणावर लक्ष देत आहे. लवकरच विराट कोहलीकडून याबाबत उत्तर मागवण्यात येईल.
विराट कोहली सध्या डरहॅम येथे असून, तो भारतीय क्रिकेट संघासोबत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा ४ ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे.