T20 World Cup : Virat Kohli ने पाकिस्तानचं टेंशन आणखी वाढवलं; ICCकडून मिळाली 'दिवाळी' भेट, Babar Azam ला धक्का

T20 World Cup 2022, ICC T20 Rankings : विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात जो जलवा दाखवला त्याने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध झाले. विराटची ती अविश्वसनीय खेळी अजूनही भारतीयांच्या मनात ताजी आहे.

T20 World Cup 2022, ICC T20 Rankings : विराट कोहलीने ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात जो जलवा दाखवला त्याने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध झाले. विराटची ती अविश्वसनीय खेळी अजूनही भारतीयांच्या मनात ताजी आहे. १६० धावांचा पाठलाग करताना चार फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर भारतीयांनी विजयाच्या आशाच सोडल्या होत्या, तर दुसरीकडे पाकिस्तानींना विजयाचे स्वप्न पडू लागले होते.

विराट व हार्दिक पांड्या यांनी दिवाळीपूर्वीच मेलबर्नवर पाकिस्तानविरुद्ध फटाके फोडले आणि रोमहर्षक विजय मिळवून दिला. बाबर आजम अँड टीमचा चेहरा पाहण्यासारखा होता, जेव्हा आर अश्विनने विजयी चौकार खेचला अन् मेलबर्न स्टेडियमवर ९० हजारांहून अधिक प्रेक्षक सेलिब्रेशन करताना दिसले. विराटच्या या खेळीनंतर ICC नेही त्याला मोठं गिफ्ट दिलं अन् त्यामुळे पाकिस्तानचं टेंशन पुन्हा वाढलं.

आयसीसीच्या ताज्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील क्रमवारीत विराटने मोठी झेप घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत ३५ व्या क्रमांकावर असलेला विराट आज ९व्या क्रमांकावर आला आहे. India vs Pakistan सामन्याआधी विराट १५व्या क्रमांकावर होता, परंतु त्याच्या नाबाद ८२ धावांच्या अविश्वसनीय खेळीने सारे चित्र बदलले.

विराटची टॉप टेनमध्ये एट्री झाली. विराटचा हा फॉर्म असाच कायम राहिला तर तो टॉप फाईव्हमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांनाही टक्कर देऊ शकतो. मोहम्मद रिझवान ८४९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दमदार खेळीच्या जोरावर थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

किवी फलंदाजाने भारताच्या सूर्यकुमार यादव (८२८) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर ( ७९९) यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर ढकलले. विराटकडे ६३५ रेटिंग पॉईंट आहेत आणि त्याच्यापुढे श्रीलंकेचा पथूम निसंका ( ६५८), ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( ६८१), इंग्लंडचा डेवीड मलान ( ७५४) आणि आफ्रिकेचा एडन मार्कराम ( ७६२) हे आहेत.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा १६व्या व लोकेश राहुल १८व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार ( ६४७) दहाव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वन डे आणि ट्वेंटी-२०त टॉप १० मध्ये विराट हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.