जून २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा वेस्ट इंडिज व अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आतापासून तयारीला लागली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघाला ११ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळायला मिळणार आहेत आणि त्यापैकी ५ ( वि. ऑस्ट्रेलिया) झाले आहेत.
वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यात पाच तास बैठक झाली. त्यात बीसीसीआयचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते आणि त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा रोडमॅप ठरवला.
विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती मागितली. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका ही निवड समितीला वर्ल्ड कप तयारीसाठी अंतिम ११ निवडण्याची शेवटची संधी असेल.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार रोहित व बुमराह यांचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील स्थान निश्चित मानले जातेय, परंतु विराटला ती संधी मिळेलच याची खात्री नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला व खजिनदार आशिष शेलार हेही या बैठकीत उपस्थित होते.
२०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित व विराट दोघंही ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेले नाहीत. पण, रोहितने वन डे वर्ल्ड कपमध्ये ५९७ धावा केल्या, तर विराटने ७६५ धावा चोपल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला होता. त्यामुळे बीसीसीआयला रोहितनेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये संघाचे नेतृत्व करावे असे वाटतेय.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय आणि निवड समितीला आक्रमक फटकेबाजी करणारा खेळाडू हवाय आणि त्यांनी इशान किशनला पसंती दर्शवली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी तो योग्य पर्याय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळल्यास सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे संघातील रिक्त जागा भरतील. त्यामुळे विराटला जागा मिळणे अवघड आहे. त्यामुळे बीसीसीआय लवकरच याबाबतील विराटची चर्चा करणार आहेत. विराट विरुद्ध बीसीसीआय असा चर्चेचा विषय पुन्हा मिळू नये म्हणून ही खबरदारी असेल.