Virat Kohli skip South Africa ODIs : रोहित शर्मानं दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर आता विराट कोहली ( Virat Kohli) आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. BCCIनं अधिकृत घोषणा केली नसली तरी BCCIच्या अधिकाऱ्यानं ANIशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रोहितची वन डे संघाच्या कर्णधारपदावर निवड केल्यामुळे विराट नाराज असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. विराटला ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती स्वतः बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं केली होती. पण, त्यानं ते ऐकलं नाही. त्यामुळे बीसीसीआय व निवड समितीनं मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार असावा असा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताच बीसीसीआयनं यापुढे रोहित शर्मा हाच वन डे व ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार असेल हे जाहीर केले अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना विराटनं वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही हा निर्णय घेतला गेला.
बीसीसीआयच्या या निर्णयावर विराट कोहली नाराज असल्याची चर्चा रंगतेय... त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराटचा फोन बंद असल्याची माहिती दिली. त्याच वेळी विराट सोशल मीडियावर अॅक्टीव असूनही त्यानं रोहितला कर्णधारपदासाठी शुभेच्छा दिल्या नाही.
विराट बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचा फोन उचलत नसल्याचा किंवा त्यांना रिप्लाय देत नसल्याचेही वृत्त समोर आले आहे. त्यात विराटनं आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. तो थेट क्वारंटाईनमध्ये दाखल झाला. त्यामुळे विराटच्या नाराजीच्या चर्चा आणखी जोर धरू लागल्या.
त्यात विराट कोहलीनं आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेतून विश्रांती घेण्याचे बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे नवनियुक्त कर्णधार रोहितच्या नेतृत्वाखाली विराटची खेळण्याची तयारी नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयच्या घोषणेनंतर रोहितच्या नेतृत्वाखालील भारताची ही पहिलीच वन डे मालिका आहे.
या चर्चांवर BCCIच्या अधिकाऱ्यानं महत्त्वाचं विधान केलं. तो म्हणाला,वन डे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे विराटनं कळवले आहे. त्याला कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका. विराट व रोहित यांच्यात मतभेद नाही.