विरूष्काचा कौतुकास्पद निर्णय! गरजू लोकांसाठी सुरू केली 'SeVVA', नावानंच जिंकली मनं

virat kohli SeVVA foundation : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लोकांच्या मदतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आपापल्या फाउंडेशनला विलीन करून 'SeVVA' हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

विराट-अनुष्का यांनी संयुक्त निवेदन जारी करून याची अधिकृत घोषणा केली आहे. 'सेवा' (SeVVA) लाँच करताना या स्टार जोडप्याने सांगितले की, हा नवीन उपक्रम गरजू लोकांना मदत करेल तसेच कोणत्याही विशिष्ट कारणापुरता मर्यादित नसेल.

विराट आणि अनुष्का यांनी संयुक्तपणे म्हटले की, "खलील जिब्रान यांच्या शब्दात सांगायचे तर, जीवनच जीवन देते. त्यामुळे तुम्ही जे स्वत:ला देणारे समजता, ते फक्त साक्षीदार आहात. ही भावना लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आम्ही सेवेच्या माध्यमातून एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे."

तसेच सेवेचे कार्य कोणत्याही विशिष्ट मुद्द्यापुरते मर्यादित राहणार नाही. ते पुढे चालूच राहील. मानवतेला आधार देत सामाजिक हितासाठी प्रयत्न करणे, ही काळाची गरज असल्याचे या स्टार जोडप्याने स्पष्ट केले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी यापूर्वीही सामाजिक कार्य आणि समाजाच्या भल्यासाठी योगदान दिले आहे. कोविड-19 दरम्यान या जोडप्याने पंतप्रधान मदत निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीला सुमारे 11 कोटी रूपये दिले होते.

याशिवाय किंग कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ॲनिमल वेल्फेअर एनजीओ पेटा शी देखील संबंधित आहे. तर कोहली ॲथलीट डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारे (ADP) खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याचे काम करते.

आतापर्यंत विराट कोहली व्हीके फाउंडेशन चालवत होता. या माध्यमातून नवीन खेळाडूंना आर्थिक मदत केली जाते. त्याचवेळी अनुष्का शर्माचे फाउंडेशन मुक्या प्राण्यांसाठी काम करायचे. अशातच दोघांनीही आपले फाउंडेशन विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे दोघांनीही आपल्या फाऊंडेशनचे नाव SeVVA असे ठेवले आहे. जे खेळाडू आणि प्राणी दोघांसाठी काम करेल.

दरम्यान, या फाउंडेशनच्या नावानेच विरूष्काच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. VVA या नावात विराट, वामिका (मुलगी) आणि अनुष्का यांच्या नावाचा उल्लेख आहे.

विराट गुरुवारी पत्नी अनुष्का शर्मासोबत स्पोर्ट्स ऑनर अवॉर्डसाठी पोहोचला होता. याशिवाय नीरज चोप्रा, शुबमन गिल आणि रणवीर-दीपिकासारखे सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.