आरोन फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या न्यूझीलंडविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. आज फिंचने त्याच्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्यापूर्वीच फिंचने निवृत्तीची घोषणा केली होती.
आरोन फिंचने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली. त्याने पोस्ट करत म्हटले, 'हा प्रवास अप्रतिम होता. महान खेळाडूंसोबत खेळणे अथवा महान खेळाडूंच्या विरोधात खेळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे बालपणीचे स्वप्न होते आणि मला इतक्या संधी मिळतील अशी अपेक्षा कधीच नव्हती.'
'एवढे प्रेमळ शब्द, मेसेज आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.' अशा शब्दांत फिंचने चाहत्यांचे आभार मानले. यावेळी फिंचला अनेक अभिनंदनाचे मेसेज आले, पण आयपीएलमध्येकाही काळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एकत्र खेळणाऱ्या विराट कोहलीचा मेसेज काही खास होता.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने लिहले, 'शाब्बास फिंची. इतकी वर्षे तुझ्याविरुद्ध खेळणे आणि आरसीबीमध्ये एकत्र खेळणे खूप छान होते. तुझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्याचा पुरेपुर आनंद घे', विराटचा हा भावनिक मेसेज क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
आरोन फिंच आता त्याचे संपूर्ण लक्ष टी-२० क्रिकेटवर केंद्रित करणार आहे. फिंचसाठी २०२१ हे वर्ष काही खास राहिले नाही. त्याने मागील वर्षी १२ डावांमध्ये १३ च्या खराब सरासरीनुसार केवळ १६९ धावा केल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मागील २६ डावांमध्ये फिंचला अवघ्या २६ धावा करता आल्या आहेत.
आरोन फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,४०१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १७ शतकी खेळींचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके रिकी पाँटिंगच्या नावावर आहेत. पाँटिंगने २९ तर डेव्हिड वॉर्नर आणि मार्क वॉने १८-१८ शतके झळकावली आहेत.
आरोन फिंचने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने ३० सामने जिंकले आहेत. फिंचने २०१३ मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याने २०१४ मध्ये कारकिर्दीतील पहिले शतक स्कॉटलंडविरूद्ध झळकावले होते.
फिंचची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १५३ आहे, जी त्याने मार्च २०१९ मध्ये शारजाहमध्ये पाकिस्तानविरुद्ध केली होती. त्याने २०१९ या एका वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये चार शतके झळकावली आहेत.