Simran Skaikh: धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती

Simran Skaikh WPL: सध्या मुंबईत महिला प्रीमियर लीगचा थरार रंगला आहे.

आज महिला साडी, टिकली यात अडकून पडलेली नाही. करीअरच्या नवनवीन संधीच्या शोधात ती घराचा उंबरठा ओलांडत आहे आणि समाजासमोर एक स्वतःचा वेगळा आदर्श निर्माण करत आहे. यंदापासून सुरू झालेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये अशा अनेक महिला खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे व्यासपीठ गाठले आहे.

आयपीएलच्या धरतीवर महिला प्रीमियर लीगची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या लीगच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. उत्कृष्ट फलंदाजी, क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबईच्या धारावीतील वायरमनच्या मुलीने देखील या स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात आर्थिक समस्येमुळे अनेकांना आपले ध्येय गाठताना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, हे कठीण असले तरी, ते अशक्य अजिबात नाही. याचाच प्रत्यय म्हणजे धारावीतील सिमरनवानो जाहिद अली शेखचा संघर्षमय प्रवास.

धारावीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या सिमरनवानो जाहिद अली शेख हिने वयाच्या 21 व्या वर्षी गरूडझेप घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवरील महिला प्रीमिअर लीग (WPL) स्पर्धेसाठी यूपी वॉरियर्सच्या संघात तिची निवड झाली आहे.

खरं तर वयाच्या आठव्या वर्षापासून धारावी आझाद नगरच्या गल्लीबोळातील लहान मुलांसह क्रिकेटचे धडे गिरविणाऱ्या सिमरनने बालवयातच राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. आज तिचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे.

अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या धारावी जस्मिन मिल रोडवरील आझाद नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका वायरमनच्या मुलीचा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सिमरनचा जन्म 12 जानेवारी 2022 साली धारावीतील एका गरीब कुटुंबात झाला.

सात भावंडांमध्ये ती तिसरी असून संपूर्ण कुटुंबाचा भार तिच्या एकट्या वडिलांवर होता. आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांनी तिला माहीमच्या महानगर पालिकेच्या शाळेत घातले.

लहानपणापासून सिमरनचा खेळण्याकडे कल अधिक असल्याने तिचे अभ्यासात मन लागत नव्हते, शाळेतून परतल्यावर आपल्या भावंडांसह मैदानी खेळात ती इतकी रमली की गोट्या, भवरे, क्रिकेटसारख्या खेळात परिसरात तिने आपले वर्चस्व निर्माण केले. घरातील काम सोडून तिने खेळाला प्राधान्य दिले.

आजूबाजूच्या मुलांमध्ये खेळत असताना सिमरनला क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाली. तिची फलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहून आझाद नगरमधील क्रिकेट संघाने वयाच्या 13 व्या वर्षी तिला आपल्या संघात घेतले.

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करून सिमरनने आपली क्षमता दाखवून दिली. उत्कृष्ट फलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर स्थानिक स्पर्धांमध्ये सामनावीर, मालिकावीर यांसारखी अनेक पारितोषिके तिने पटकाविली.

सिमरनची कामगिरी पाहून जुबेर शेख नावाच्या तरुणाने वयाच्या 15 व्या वर्षी सिमरनला प्रशिक्षणासाठी क्रॉस मैदानमधील रुमडे क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले. प्रशिक्षण सुरू असताना युनाइटेड क्लबमध्ये खेळताना तिने मैदान गाजवले.

दररोजच्या सरावामुळे तिला दहावीतच शाळा सोडावी लागली. नंतर तिने शिवाजी पार्कातील चाचणी शिबिरात भाग घेऊन आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने मैदान गाजवले अन् अंडर -19 साठी तिची निवड झाली. मुंबईच्या अंडर-19 संघातील चांगल्या कामगिरीच्या आधारे तिची मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड झाली.

सिमरन स्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे. याशिवाय अतिशय चपळ क्षेत्ररक्षण आणि अचूक थ्रोसाठी तिला ओळखले जाते. त्यामुळे महिला प्रीमियर लीग 2023च्या लिलावात तिला यूपी वॉरियर्सच्या फ्रँचायझीने 10 लाख रुपयांत खरेदी केले.

लक्षणीय बाब म्हणजे सिमरन अजूनही धारावीतच राहते. महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा तिच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट आहे. या स्पर्धेने दिला एक ओळख दिली असून तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.