महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिच्या नावावर आहे. लॅनिंगने तिच्या कारकिर्दीत एकूण १७ शतके झळकावली आहे, तिने १०३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ शतके आणि १३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २ शतके झळकावली आहेत. परंतु, तिला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाही.
भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिने आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. बुधवारी (१७ सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर तिने एकाच झटक्यात दोन खेळाडूंना मागे टाकले. मानधना हिने सात कसोटी सामन्यात दोन शतके, १०७ एकदिवसीय सामन्यात १२ आणि १५३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आहे.
न्यूझीलंडची तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू सुझी बेट्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १४ शतके ठोकली आहेत. बेट्सने १७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३ शतके आणि १७७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक झळकावली आहेत. तिने एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
इंग्लंडची अनुभवी फलंदाज टॅमी ब्यूमोंटच्या नावावरही १४ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. तिने ११ कसोटी सामन्यांमध्ये एक शतक झळकावले आहे. ब्यूमोंटने १३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ शतके आणि १०९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक झळकावले आहे.
इंग्लंडची माजी महान फलंदाज चार्लोट एडवर्ड्स या यादीत पाचव्या स्थानावर आहे. तिने तिच्या कारकिर्दीत एकूण १३ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. एडवर्ड्सने २३ कसोटी सामन्यांमध्ये चार शतके आणि १९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये नऊ शतके झळकावली आहेत. तिने ९५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकही शतक झळकावले नाही.