WPL Auction 2024 : यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश

women's premier league auction : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी शनिवारी लिलाव पार पडला.

महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी शनिवारी लिलाव पार पडला. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली होती. मात्र, मोजक्याच खेळाडूंवर फ्रँचायझींनी पैसा ओतला अन् त्यांना आपल्या ताफ्यात घेतले.

यंदाच्या लिलावासाठी १०४ भारतीय खेळाडू लिलावाच्या रिंगणात होते, तर ६१ परदेशी खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदवले होते.

शनिवारी झालेल्या लिलावात काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला. टॉप-५ महागड्या खेळाडूंच्या यादीत दोन भारतीयांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. पदार्पणाच्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला किताब जिंकण्यात यश आले होते.

भारताची अनकॅप्ड खेळाडू काशवी गौतमवर बरीच बोली लागली. तिला खरेदी करण्यासाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चुरस झाली. यानंतर आरसीबीने अखेर माघार घेतली अन् काशवी गुजरातच्या ताफ्यात गेली.

आरसीबीने माघार घेतल्यानंतर यूपी वॉरियर्सने बोली लावायला सुरुवात केली होती. यूपी आणि गुजरातमध्ये जोरदार लढत झाली. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले, जी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चांगलीच चढाओढ झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीही संघ पदार्पणाच्या हंगामातील फायनलिस्ट आहेत. मात्र, इथे मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने हार मानली अन् अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले.

अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडची मूळ किंमत ४० लाख रूपये होती, जिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांत खरेदी केली. सदरलँडला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात स्पर्धा होती, पण दिल्लीने बाजी मारली.

भारताची अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेश हिने सर्वांना चकित केले. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती. पण, तिला यूपी वॉरियर्सने १.३० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. अनेक नामांकित खेळाडू अनसोल्ड राहिले असताना वृदांवर लागलेली ही बोली क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनली.

मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने मोजकेच पण चांगले खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यावर भर दिला. दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू शबनीम इस्माइलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चढाओढ झाली. त्यानंतर गुजरात जायंट्सच्या फ्रँचायझीने यात उडी घेत आफ्रिकन खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मुंबई इंडियन्सने बाजी मारत १.२० कोटी रूपयांत शबनीमला आपल्या संघाचा भाग बनवले. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल, जिची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. तिला मुंबई इंडियन्सने १ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतले.

ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफील्डला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात चांगलीच लढत झाली. पण, गुजरातच्या फ्रँचायझीने सर्वाधिक पैसे असल्याचा फायदा घेत स्टार खेळाडूला १ कोटींच्या किंमतीत आपल्या ताफ्यात घेतले.