नेदरलँड्सने यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील दुसरा धक्कादायक निकाल नोंदवताना बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला ३८ धावांनी नमवले. याआधी रविवारी अफगाणिस्तानने गतविश्वविजेत्या इंग्लंडला नमविण्याचा पराक्रम केला होता.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर नेदरलँड्सने प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन करत ४३ षटकांत ८ बाद २४८ धावा केल्या. यानंतर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला ४२.५ षटकांत २०७ धावांत गुंडाळले.
पावसामुळे दोन तास उशिराने सुरू झालेला हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा खेळविण्यात आला. धावांचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ ८९ धावांवर गारद करत नेदरलँड्सने वर्चस्व मिळवले.
डेव्हिड मिलर आणि केशव महाराज यांनी अपयशी झुंज दिली. लोगान वॅन बीकने ३, तर पॉल वॅन मीकरेन, रोएलोफ वॅन डेर मर्व्ह आणि बास डी लीडे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकातही नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
एकेकाळचे संघसहकारी दक्षिण अफ्रिकेच्या संघासाठी आता कर्दनकाळ ठरल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघात असे खेळाडू होते. जे एकेकाळी दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. याशिवाय या संघात न्यूझीलंड आणि भारतीय वंशाचे देखील खेळाडू आहेत.
कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे...या खेळाडूंनी आधी दक्षिण आफ्रिकेकडून वेगवेगळ्या वेळी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटही खेळले आहे. कॉलिनने आपल्या जुना संघ असलेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १२ धावा केल्या आणि १ बळी घेतला. तर सायब्रँड एंजेलब्रेक्टने १९ धावा केल्या आणि एक झेल घेतला. याशिवाय रोएलॉफ व्हॅन डर मर्वेने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोएलॉफने १९ चेंडूत २९ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीतही २ महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या.
नेदरलँड संघात न्यूझीलंड आणि भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आहेत. न्यूझीलंडचे मूळ रहिवासी लोगान वॅन बीक आणि मॅक्स ओ'डॉड हे डच संघाचा भाग आहेत. २०१०मध्ये अंडर-१९ वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघामध्ये वीक्सचा समावेश करण्यात आला होता. बीक हा सॅमी गिलेन यांचा नातू आहे, जो वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी कसोटी क्रिकेट खेळला होता.
पंजाबमधील चीमा चीमा खुर्द येथे जन्मलेला विक्रमजीत सिंग सध्या नेदरलँड संघाचा एक भाग आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो २ धावा करून स्वस्तात बाद झाला. पण या विश्वचषकात त्याने हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध ५२ धावांची शानदार खेळी केली.