भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वाधिक संपत्ती असलेले क्रिकेट मंडळ आहे. बीसीसीआयची एकूण मालमत्ता अंदाजे १८ हजार ७६० कोटी रुपये इतकी आहे. या उत्पन्नाचा प्रमुख भाग आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांचे प्रसारण हक्क, तसेच टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवरील स्वतंत्र करार यामधून येतो. त्याशिवाय, प्रायोजकत्व करार आणि आयपीएलमधून मिळणारा महसूल हे देखील मंडळासाठी मोठे आर्थिक स्रोत ठरले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ असून त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६५८ कोटी आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांशिवाय, बिग बॅश लीग या टी-२० लीगमधूनही सीएला चांगले उत्पन्न मिळते.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळांचे उत्पन्न ४९२ कोटी रुपये असून, त्याचा मुख्य स्रोत म्हणजे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टीव्ही हक्क, द हंड्रेड लीग, आणि प्रायोजकत्व करार आहेत. क्रिकेटचा उगम इंग्लंडमध्येच झालेला असल्याने ईसीबीला ऐतिहासिक महत्व आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांची मालमत्ता ४५८ कोटी रुपये इतकी आहे. पाकिस्तान सुपर लीग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे प्रसारण हक्क हे पीसीबीच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.
या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे उत्पन्न ४२५ कोटी आहे. बीसीबीचे उत्पन्न तिकीट विक्री, आणि बांगलादेश प्रीमियर लीग यावर आधारित आहे.